'मोदी सरकारने खोटी आकडेवारी लोकांच्या पचनी पाडली'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

2008 मधील मंदीच्या धक्क्यातून बाहेर आलेली भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या कार्यकाळात रुळावरुन घसरली असल्याचे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली : 'दहा वर्षांपूर्वी मंदीच्या धक्क्यातून बाहेर आलेली भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या कार्यकाळात रुळावरुन घसरली असल्याचे' काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. 

'अर्थव्यवस्था वर येईल असे विचार ज्या लोकांनी मांडले होते, ते लोक निराश होऊन आता सरकारला सोडून जात आहेत. हे सरकार खोटी आकडेवारी तयार करते आणि लोकांना अशी माहिती पचनी पाडावी लागते,' असे चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधत म्हटले आहे. चिदंबरम यांच्या 'अनडॉन्टेड: सेविंग द आइडिया ऑफ इंडिया' या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती हमिद अंन्सारी यांच्या हस्ते 8 फेब्रुवारीला होणार आहे.

या पुस्तकाच्या परिचयात चिदंबरम यांनी लिहीले आहे की, 'एक जुनी सभ्यता जी अनेक धर्म, संस्कृती, भाषा, समुदाय आणि जातींना जोडून ठेवली आहे, यांनी गेल्या 71 वर्षांत आधुनिक राष्ट्र होण्याच्या दिशेने प्रयत्न केला. मात्र आज त्याचे इतके ध्रुवीकरण आणि विभाजन केले आहे की, त्यापासून आपल्या लोकांना वाचवणे हे चिंतेचे खरे कारण बनले आहे.'

तसेच, 'माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी लोकशाहीच्या मुलभूत नियमांची समज होती. त्यांनी सौजन्याने 13 दिवसांनंतर, त्यानंतर 13 महिन्यांनंतर आणि पुन्हा एकदा पाच वर्षानंतर सत्ता सोडून दिली होती. त्यांच्या या उदाहरणाला त्यांचाच पक्ष विसरला आहे. आज जे स्वयंसेवक सत्तेत बसले आहेत, त्यांनी या उदाहरणाची वैयक्तिक टीकाही केली होती.' असेही पुस्तकात म्हटले आहे. 
 

Web Title: modi government dismantled economy of india says congress leader and former union finance minister p chidambaram