मोदी सरकार बांधणार नवीन संसद?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

काही वर्षांपूर्वी नवीन संसद भवन बांधण्याची चर्चा जोरात होती. ब्रिटिशांनी संसद भवन बांधताना चारही बाजूला एवढीच प्रशस्त संसद भवन उभी राहील अशी मोकळी जागा सोडली होती...

नवी दिल्ली : तब्बल 92 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेले गोलाकार संसद भवन दिल्लीच नव्हे तर संपूर्ण भारताची शान आहे. मात्र कालौघात या संसद भवनाची जीर्ण इमारत आपल्या व्यथा वेदना वारंवार बोलून दाखवू लागली आहे. हे लक्षात घेऊन नवीन आणि सुसज्ज संसद भवन बांधण्याचे मोदी सरकारने मनावर घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी काल तर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज संसद भवन नव्याने उभारण्याची इच्छा आणि सूचना मोदी सरकारला केली. या सूचना ज्या आग्रहीपणे आल्या आहेत ते पाहता संपूर्ण जगात नावाजले जाईल असे देखणे, अत्याधुनिक व नवीन संसद भवन उभारण्याचे कारणे मनावर घेतले असावे असे मानण्यास पुरेपूर वाव आहे.

parliament

या संसद भवनात भव्यदिव्यता आहे. ब्रिटिशकालीन देखणेपण आहे आणि ऐतिहासिकताही आहे. ही दगडात बांधलेली इमारत आता जुनी झाली आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही. दिल्लीत क्वचितच कोसळणारा जोरदार पाऊस एखाद्या वर्षी पडला तर संसद भवनाची अनेक दालने जणू काय आसवे गाळू लागतात! अनेक भागांमध्ये आणि संसदेच्या गल्ल्यांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही. इंटरनेटच्या जमान्यात अनेक भागांमध्ये मोबाईलची रेंज नाही. पुरेसे वायुवीजनही दुरापास्त आहे.

काही वर्षांपूर्वी राज्यसभेचे कामकाज चालू असताना धूर येऊ लागला यंत्रणेची प्रचंड धावपळ उडाली. त्यानंतर संसदेमध्ये खाद्यपदार्थ ठेवण्यास मनाई करण्यात आली संसद भवनाच्या एका भागात मध्यंतरी आग लागण्याचा प्रकारही झाला होता. सभागृह राज्यसभा ही ब्रिटिश हाऊस ऑफ लोर्डच्या धर्तीवर बांधले गेल्याने तेथील भागांची रचना तुलनेने सुटसुटीत आहे. मात्र लोकसभेत मध्येच काम आल्याने त्यामागे बसणार्‍या नवख्या सदस्यांना सभापतींचे आसनही दिसू शकत नाही. 

parliament

या साऱ्या अडचणी लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी नवीन संसद भवन बांधण्याची चर्चा जोरात होती. ब्रिटिशांनी संसद भवन बांधताना चारही बाजूला एवढीच प्रशस्त संसद भवन उभी राहील अशी मोकळी जागा सोडली होती. कालौघात वेगवेगळ्या इमारती बांधण्यात आल्या त्यामुळे आता प्रस्तावित नवे संसद भवन बांधायचे असेल तर मोदी सरकारला त्याच्या आसपासची जागा शोधावी लागणार असे चित्र दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi Government possibility to built news building of parliament