'ओआरओपी'बाबत मोदी खोटे बोलत आहेत: केजरीवाल

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - माजी सैनिकाने विष पिऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशातील जवान आणि शेतकरी आत्महत्या करत असल्याचे म्हणत वन रॅंक वन पेन्शन लागू केली असे सांगणारे मोदी खोटे बोलत असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

नवी दिल्ली - माजी सैनिकाने विष पिऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशातील जवान आणि शेतकरी आत्महत्या करत असल्याचे म्हणत वन रॅंक वन पेन्शन लागू केली असे सांगणारे मोदी खोटे बोलत असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

वन रॅंक वन पेन्शन (ओआरओपी) प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या एका माजी सैनिकाने विष पिऊन आत्महत्या केली आहे. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी ट्‌विटरद्वारे म्हटले आहे की, "मोदींच्या काळात जवान आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत. याचाच अर्थ वन रॅंक वन पेन्शन (ओआरओपी) लागू केली असे म्हणत मोदी खोटे बोलत आहेत.' तसेच "जर ओआरओपी लागू केली असती तर राम किशनजी यांनी आत्महत्या का केली असती?' असा प्रश्‍नही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. जे सैनिक देशाच्या शत्रूशी सीमेवर लढत आहेत त्यांना त्यांच्या हक्कांसाठी देशात लढावे लागते हे फार वाईट असल्याचेही ते पुढे म्हणाले.

दरम्यान आज (बुधवार) कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी राम किशनजी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघाले असताना त्यांना सुरक्षा रक्षकांकडून रोखण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांना संसद रस्त्यावरील पोलिस स्थानकात आणण्यात आले. कॉंग्रसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार गांधी यांना टिळक रोडवरील पोलिस स्थानकात हलविण्यात आले आहे. याशिवाय राम किशनजी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यास निघालेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. "गेल्या सहा तासांपासून मला संसद रस्ता पोलिसांनी ताब्यात ठेवले आहे. कोणीही मला हे सांगायला तयार नाही की माझा दोष काय आहे?' अशी माहिती सिसोदिया यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

Web Title: Modi is lying : Arvind Kejriwal