मोदीजी, 'ओआरओपी' लागू करो - राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - एक पद एक निवृत्तिवेतनाच्या (ओआरओपी) मुद्द्यावरून माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येने पुन्हा ऐरणीवर आलेल्या या प्रश्‍नावरील वाद शमण्याची चिन्हे दिसत नसल्याचे आज स्पष्ट झाले.

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर आंदोलन करीत असलेल्या माजी सैनिकांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन यावर चर्चा केली आणि मोदी सरकारने ही योजना लागू केलेली नाही, असे सांगून "मोदीजी झूठ बोलना बंद करो, ओआरओपी लागू करो,' अशी घोषणा केली.

नवी दिल्ली - एक पद एक निवृत्तिवेतनाच्या (ओआरओपी) मुद्द्यावरून माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येने पुन्हा ऐरणीवर आलेल्या या प्रश्‍नावरील वाद शमण्याची चिन्हे दिसत नसल्याचे आज स्पष्ट झाले.

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर आंदोलन करीत असलेल्या माजी सैनिकांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन यावर चर्चा केली आणि मोदी सरकारने ही योजना लागू केलेली नाही, असे सांगून "मोदीजी झूठ बोलना बंद करो, ओआरओपी लागू करो,' अशी घोषणा केली.

माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्यासमवेत राहुल यांनी या माजी सैनिक प्रतिनिधींची भेट घेतली. "यूपीए' सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केलेल्या "ओआरओपी' योजनेबद्दल बोलताना या सैनिकांनी सांगितले, की ती योजना आहे तशी लागू केल्यास सैनिकांना ती मान्य असेल. बैठकीनंतर बाहेर पत्रकारांबरोबर वार्तालाप करताना राहुल म्हणाले, की मोदी सरकारने "ओआरओपी' योजना लागू केली नसल्याचे या सैनिक प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेतून निष्पन्न झाले आहे. सध्या लागू असलेली योजना केवळ पैसेवाढीची आहे आणि त्यामध्ये सैनिकांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांवर निर्णय करण्यात आलेला नाही. विशेषतः सातवा वेतन आयोग लागू करणे, तसेच शारीरिक अपंगत्वाबाबतच्या पेन्शनबाबतचा मुद्दा यावर निर्णय झालेले नाहीत. सरकारने त्याबाबत त्वरित निर्णय करावा, अशी आमची मागणी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "ओआरओपी' लागू करण्यात आल्याचे खोटे बोलत आहेत. त्यांनी खोटे बोलणे थांबवावे आणि ही योजना तत्काळ लागू करावी, अशी मागणी करून राहुल गांधी म्हणाले, की मोदी सरकारने 15 उद्योगपतींना एक लाख दहा कोटी रुपयांची मदत केली; परंतु देशाच्या जवानांना पैसे देण्याची त्यांची तयारी नाही. आमच्याशी चर्चा करताना या सैनिक प्रतिनिधींनी असेही सांगितले, की सरकारने त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगावे. आम्ही मागण्या मागे घेऊ; परंतु मानहानिकारक आर्थिक वाढ सहन करणार नाही.

जबाबदारीची अपेक्षा - जेटली
अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही आज या वादात उडी घेतली. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी जबाबदारीने वागण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी राहुल यांचे नाव न घेता सांगितले. ज्या पक्षाचे भवितव्य फारसे चांगले नाही ते असे मुद्दे घेऊन आपले अस्तित्व टिकविण्याची धडपड करीत आहेत, असे सांगतानाच राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दलही त्यांनी नाव न घेता नापसंती व्यक्त केली. अशा मुद्द्यांवर बोलताना मंत्र्यांनी संवेदनशीलता दाखविण्याची अपेक्षा असते, असे जेटली म्हणाले. एका व्यक्तीच्या वैयक्तिक शोकांतिकेवर अशा पद्धतीचे राजकारण करणे हे शोभनीय नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

ज्या राहुल गांधी यांच्या आदेशावर यूपीए सरकार चालत होते त्या सरकारला राहुल गांधी यांनी आदेश देऊन ही योजना लागू का केली नाही, असा प्रश्‍नही जेटली यांनी केला. यूपीए सरकारने दहा वर्षे सत्तेत राहून माजी सैनिकांसाठी काही केले नाही आणि सरकार जाण्याची वेळ आल्यावर केवळ 500 कोटी रुपयांची तरतूद केली याची आठवणही जेटलींनी दिली.

Web Title: modi may apply orop by rahul gandhi