दांडीबहाद्दर मंत्र्यांना मोदींची तंबी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्युटी लावली जाते यावेळी बरेच मंत्री गैरहजर असतात याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली.

नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्युटी लावली जाते यावेळी बरेच मंत्री गैरहजर असतात याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेत उपस्थित राहणे या जबाबदारीपासून मंत्री असोत की खासदार ते पळू कसे शकतात, असा तीव्र प्रश्न मोदींनी विचारला.

भाजप संसदीय पक्षाची बैठक बालयोगी सभागृहात आज सकाळी झाली. त्यानंतर संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीतील माहिती दिली.
संसद अधिवेशनाच्या काळात सभागृहांमध्ये हजर राहत जा असे पंतप्रधानांनी 2014 पासून अनेकदा सांगूनही सत्तारूढ खासदार आणि मंत्र्यांवर त्याचा अपेक्षेइतका परिणाम होत नसल्याचे पाहून मोदी देखील आता वैतागल्याचे चित्र आहे. आजच्या बैठकीत याचेच प्रतिबिंब उमटले ज्या मंत्र्यांची रोस्क ड्युटी लावलेली असेल ते सभागृहात हजर न राहणे हा निष्काळजीपणा आणि बेपर्वाई आहे ती सहन केली जाणार नाही असा इशारा देऊन पंतप्रधानांनी सांगितले की खासदारांना आणि मंत्र्यांना जनतेने मोठी जबाबदारी दिली आहे आपण समजून घ्यायला पाहिजे. ज्या मंत्र्यांची सभागृहात रोस्टर ड्युटी असेल येत नाहीत ती आपल्याला सांगा असे सांगताना मोदींनी "हमे सबको ठीक करना आता है' अशा तीव्र भावना व्यक्त केल्याचे कळते.

लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज चालू असेल तेव्हा किमान कॅबिनेट मंत्री उपस्थित राहणे अनिवार्य असते. राज्यसभेत विशेषतः दुपारच्या वेळेत अनेकदा मंत्र्यांचा दुष्काळ जाणवतो. लोकसभेत तर तीन तलाक विधेयकाच्या वेळी सत्तारूढ खासदारांनीच उपस्थिती पुरेशी नसल्याचे पाहून भाजपचा गोंधळ उडाला होता. या पार्श्‍वभूमीवर आज पंतप्रधानांनी संसदीय भाजपमधील   दांडीबहाद्दरांचे काम पुन्हा टोचले आहेत.

पंतप्रधानांनी आज भाजप खासदारांनी राजकारणाव्यतिरिक्त सामाजिक संवादही स्थापन करण्याच्या गरजेवर भर दिला. जलसंकटाबाबत दिल्ली आणि आपल्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांची संवाद चर्चा करा असे सांगतानाच त्यांनी पिछाडीवर असलेल्या 115 जिल्ह्याबाबत भाजप खासदारांनी काम करावे असेही आवाहन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi warns minister who not attended sessions