माझ्या आईने भारतासाठी जास्त खस्ता खाल्ल्या: राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

''माझी आई इटलीची आहे. ती माझ्या आयुष्यातील मोठा भाग आहे. माझ्या आईने देशासाठी त्याग केला. त्यामुळे मोदी जेव्हा माझ्या आईवर टीका करतात तेव्हा ते त्यांची मनोवृत्ती दाखवतात''. 

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला आज (गुरुवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ''माझी आई माझ्या आयुष्यातील मोठा भाग आहे. माझ्या आईने देशासाठी त्याग केला. माझ्या आईने भारतासाठी जास्त खस्ता खाल्ल्या''.

modi

बंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेसाठी काहीही केले नाही. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कोणताही निधी दिला नाही. मात्र, काँग्रेसने विविध योजना आणल्या आणि त्या योजनांमध्ये पैसेही गुंतवले. बेरोजगार तरूणांना नोकऱ्या देण्याचे कर्तव्य आमच्या सरकारने पूर्ण केले.  

मोदींनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली होती. त्याचाही समाचार राहुल गांधींनी घेतला. ते म्हणाले, ''माझी आई इटलीची आहे. ती माझ्या आयुष्यातील मोठा भाग आहे. माझ्या आईने देशासाठी त्याग केला. त्यामुळे मोदी जेव्हा माझ्या आईवर टीका करतात तेव्हा ते त्यांची मनोवृत्ती दाखवतात''. 

दरम्यान, पंतप्रधान मोदी महिलांच्या सुरक्षेवर बोलत नाहीत. तसेच ते दलितांबद्दलही बोलत नाहीत, यावर त्यांनी बोलणे गरजेचे असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

Web Title: Modis visit to China without any indecision says Rahul Gandhi