मथुरेजवळील अपघातातून मोहन भागवत बचावले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

यमुना द्रुतगती मार्गावर त्यांच्या मोटारीच्या पुढे असलेल्या सुरक्षा वाहनाचा टायर फुटला. यामुळे गाडी भरकटली. त्याच वेळी भागवत ज्या गाडीत बसले होते ती सुरक्षा वाहनाला धडकली. मात्र, यात सरसंघचालक सुरक्षित असून वृंदावनला रवाना झाले

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे शुक्रवारी अपघातातून बचावले. कार्यक्रमासाठी मथुरेकडे जात असताना यमुना द्रुतगती मार्गावर त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातील एका मोटारीचा टायर फुल्याने अन्य गाड्यांची टक्कर झाली. मात्र, या अपघातातून भागवत सुखरूप बचावले असून, त्यांना दुसऱ्या गाडीत बसवून रवाना करण्यात आले.

वृंदावन येथील निकुंज वन आश्रमात संत विजय कौशल महाराजांच्या ध्यान केंद्राच्या उद्‌घाटन कार्यक्रमासाठी भागवत आज दिल्लीहून निघाले होते. यमुना द्रुतगती मार्गावर त्यांच्या मोटारीच्या पुढे असलेल्या सुरक्षा वाहनाचा टायर फुटला. यामुळे गाडी भरकटली. त्याच वेळी भागवत ज्या गाडीत बसले होते ती सुरक्षा वाहनाला धडकली. मात्र, यात सरसंघचालक सुरक्षित असून वृंदावनला रवाना झाले. संघानेही आपल्या ट्विटर हॅंडलवर अपघाताचे वृत्त देऊन सरसंघचालक भागत सुखरूप असल्याचे कळविले आहे.

Web Title: mohan bhagwat accident mathura