मोहन भागवत, देशाची माफी मागा : मायावती

वृत्तसंस्था
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराची संघ कार्यकर्त्यांची केलेली तुलना अपमानास्पद व चिंताजनक आहे. अशा चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी

लखनौ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराची संघ कार्यकर्त्यांची केलेली तुलना अपमानास्पद व चिंताजनक आहे. अशा चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आज (मंगळवार) केली.

"जेथे लष्कराला सैन्य तयार ठेवण्यासाठी सात-आठ महिने लागतात, तेथे "आरएसएस'चे स्वयंसेवक तीन दिवसांत प्रशिक्षण घेऊन देशसेवेसाठी सीमेवर लढू शकतील,' असे वक्तव्य भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली आहे. मायावती यांनी प्रसिद्धीपत्रकातून भागवत यांचा निषेध केला आहे.

"जर भागवत यांना त्यांच्या लढाऊ स्वयंसेवकांवर एवढा विश्‍वास असेल तर त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष कमांडोंवर सरकारचा पैसा कशासाठी खर्च केला जातो, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. "ज्या वेळेला लष्कराला विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, त्याच वेळी भागवत यांनी केलेले हे वक्तव्य सुरक्षा दलांचे मनोधैर्य खच्ची करणारे आहे,'' असे त्या म्हणाल्या.

Web Title: mohan bhagwat mayawati rss bsp