पैसा, दारू आणि ड्रग्जचा महापूर

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

आघाडीसाठी लालू प्रयत्नशील
उत्तर प्रदेशात कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये आघाडी व्हावी म्हणून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी विशेष प्रयत्न केले.
जागा वाटपावरून उभय पक्षांतील आघाडी फिस्कटू नये म्हणून ते सातत्याने मुलायमसिंह आणि कॉंग्रेस नेतृत्त्वाच्या संपर्कामध्ये होते. खुद्द लालूंनीच ट्‌विटरवरून याची माहिती दिली. लालूप्रसाद यांचे मुलायमसिंह यादव यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याने त्यांना या संघर्षात यशस्वी मध्यस्थी करणे शक्‍य झाले.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील निवडणूक प्रचार शिगेला पोचला असताना मतदारांना आपल्या बाजूंनी वळविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी अक्षरश: दारू, पैसे आणि अमली पदार्थांचा (ड्रग्ज) महापूर आणला आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यांतून निवडणूक आयोगाच्या खर्च देखरेख आणि निरीक्षण पथकाने 83 कोटी रुपयांची रोकड, बारा कोटी 65 लाख रुपयांची सात लाख लिटर दारू आणि 10 कोटी 30 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

उत्तर प्रदेशातून 79 कोटी 13 लाख, (यात 31.65 लाख रुपयांच्या जुन्या नोटा आहेत) पंजाबमधून 4 कोटी पाच लाख, उत्तराखंडमधून 33 कोटी 27 लाख आणि मणिपूरमधून 6 कोटी 95 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दारूच्या वाटपातही उत्तर प्रदेशने आघाडी घेतली आहे. "यूपी'तून 10.7 कोटी रुपयांचे 3.95 लाख लिटर मद्य जप्त करण्यात आले असून, पंजाबमधून 1 कोटी 14 लाख, उत्तराखंडमधून 72 लाख 91 हजार रुपयांचे आणि मणिपूर, गोव्यातून अनुक्रमे सात लाख 5 हजार, 1 लाख 35 हजार रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे.

उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसचे 63 उमेदवार जाहीर
उत्तराखंडसाठी कॉंग्रेसने आज 63 उमेदवारांची यादी जाहीर केली. मुख्यमंत्री हरीश रावत हे किच्छा आणि हरिद्वार ग्रामीण या दोन ठिकाणांवरून निवडणूक लढविणार आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत हे उमेदवार निश्‍चित करण्यात आले. कॉंग्रेस नेते इंदिरा हृदयेश हे हल्दवाणी, सुरेंद्रसिंह नेगी हे कोतद्वार आणि दिनेश अग्रवाल हे धर्मपूरमधून निवडणूक लढविणार आहेत.

Web Title: money, liquor and drugs flood