सुखद!; होरपळणाऱ्या महाराष्ट्रात पडणार दमदार पाऊस

Monsoon
Monsoon

पुणे - दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दमदार पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला. देशात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यंदा पाऊस सरासरी इतका राहणार आहे. त्यामुळे या वर्षीसारखे पाण्याचे भीषण दुर्भिक्ष होण्याची शक्‍यता कमी आहे. 

देशात यंदा सर्वसाधारण म्हणजे शंभर टक्के पाऊस पडेल, असे हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या सुधारित अंदाजात नमूद केल्याने तहानलेल्या महाराष्ट्राला यातून निश्‍चित दिलासा मिळेल. 

देशातील मध्य भारतात जून ते सप्टेंबरदरम्यान शंभर टक्के पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या मध्य भारतात महाराष्ट्राचाही समावेश होतो. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातही दमदार पाऊस पडेल, असे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. वायव्य भारतात 94 टक्के, दक्षिण भारतात 97 टक्के आणि ईशान्य भारतात तेथील पावसाळ्यात पडणाऱ्या सरासरी पावसाच्या 91 टक्के पाऊस पडेल, असे या सुधारित अंदाजात म्हटले आहे. मॉन्सूनवर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या सहा घटकांचा समावेश असलेल्या सांख्यिकी प्रारूपावर आधारित यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल (त्यात 4 टक्के कमी-जास्त) असा अंदाज वर्तविला आहे; तर "भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थे'ने (आयआयटीएम) विकसित केलेल्या "मॉन्सून मिशन' प्रारूपानुसार 97 टक्के (चार टक्के कमी-जास्त) पाऊस पडेल, असेही खात्याने स्पष्ट केले. 

"एल निनो' सौम्य स्थितीत 
प्रशांत महासागराच्या उष्ण पाण्याच्या प्रवाहाला "एल निनो' म्हणतात. यंदा मॉन्सून हंगामात याची स्थिती कायम राहणार असली तरी, तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत. काही हवामान प्रारूपानुसार मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात "एल निनो'चा प्रभाव कमी होऊन सर्वसाधारण स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे; तर हिंद महासागरात इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती सर्वसाधारण असून, हंगामाच्या मध्यावर "आयओडी' सकारात्मक स्थितीत जाण्याची शक्‍यता आहे. 

मॉन्सूनची सद्यःस्थिती 
मॉन्सूनने अंदमान बेटांचा संपूर्ण परिसर व्यापला आहे. अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील मालदीव बेटांवरही मॉन्सूनच्या सरी बरसत आहेत. येत्या सोमवारपर्यंत (ता. 3) बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. पुढील तीन दिवसांमध्ये मॉन्सूनच्या वाऱ्याचा प्रवाह जोर धरण्याची शक्‍यता आहे. येत्या 6 जूनला मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविला आहे.

असा होईल मॉन्सून 
पावसाचे प्रमाण ........ शक्‍यता 

90 टक्‍क्‍यांहून कमी ........15 टक्के 
90 ते 96 टक्के ........ 32 टक्के 
96 ते 104 टक्के ........ 41 टक्के 
104 ते 110 टक्के ........ 10 टक्के 
110 टक्‍क्‍यांहून अधिक ........ 2 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com