केरळ, तमिळनाडूमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा 

Representational Image
Representational Image

चेन्नई : मुसळधार पावसामुळे तमिळनाडूतील सर्वच जिल्ह्यांत पुढील दोन दिवसांसाठी 'रेड ऍलर्ट' देण्यात आला आहे. बुधवारी रात्रीपासून पुदुच्चेरी आणि परिसरामध्ये पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. 

या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने तमिळनाडूत 7 ऑक्‍टोबरपर्यंत 'रेड ऍलर्ट' घोषित करण्यात आला आहे. धोकादायक जागांवर न जाण्याचे आवाहनही प्रशासनातर्फे केले जात आहे. 6 ते 8 ऑक्‍टोबर या कालावधीत मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

केरळमध्येही सावधगिरीचा इशारा 
काही दिवसांपूर्वीच पूरस्थितीचा सामना करावा लागलेल्या केरळमध्ये पुन्हा एकदा पाऊस थैमान घालण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे केरळमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. थिसूर आणि पलक्कड येथील धरणांचे दरवाजे काल (गुरुवार) सायंकाळी काही प्रमाणात उघडण्यात आले. शनिवारपर्यंत समुद्रही खवळलेला असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे केरळमध्ये 493 जणांना जीव गमवावा लागला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com