'आरजेडीची सत्ता आली तर दहशतवाद्यांना काश्मीरपेक्षा बिहार जवळचा वाटेल'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे बिहारमधील वैशाली येथे संयुक्त जनता दलाचे उमेदवार उमेश कुशवाहा यांच्या प्रचारसभेसाठी उपस्थित होते.

पाटणा : बिहार विधानसभेची निवडणूक आता अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराचा जोर अगदी शिगेला पोहोचला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात देशात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. अशा काळात व्हर्च्यूअल प्रचारसभा आणि सोशल मीडियाद्वारे  प्रचाराला वेग आला आहे. यादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवरच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलंय की, बिहारच्या या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा विजय झाल्यास बिहारमध्ये दहशतवादी आश्रय घेतील. या वक्तव्यावर सध्या चांगलीच चर्चा होत असून या वक्तव्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर पसरला आहे. 

हेही वाचा - माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची नजरकैदेतून सुटका

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे बिहारमधील वैशाली येथे संयुक्त जनता दलाचे उमेदवार उमेश कुशवाहा यांच्या प्रचारसभेसाठी उपस्थित होते. हा व्हिडीओ 12 ऑक्टोबरचा आहे. प्रचारावेळी सभेसमोर बोलताना त्यांनी म्हटलं की, राज्यात जर लालूंच्या राजदची सत्ता आली तर दहशतवादी काश्मीर सोडतील आणि बिहारमध्ये आश्रय घेण्यास येतील.  

नित्यानंद राय यांच्या या अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्यामुळे बिहारमधील विरोधकांना मुद्दा मिळाला आहे. या वक्तव्याचा समाचार घेताना काँग्रेसचे नेते संतोष कुमार यांनी नित्यानंद यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना  प्रचारसभेपासून दूर ठेवलं पाहीजे, अशीही मागणी केली आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ता अन्वर हुसैन यांनी भाजपावर यानिमित्ताने तोंडसुख घेतलं आहे. भाजप घाबरला असून भीतीपोटी अशी वक्तव्ये करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. बिहार भाजपाने मात्र त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन केलंय.

हेही वाचा - Bihar Election:बिहार निवडणुकीत नेपोटिझम; नेत्यांकडून कुटुंबीयांना उमेदवारीची खिरापत
बिहार विधानसभेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबरला होणार असून त्यासाठीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे 3 आणि 7 नोव्हेंबरला होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mos for home nityanand rai says if RJD comes in power terrorist will take shelter in bihar escaping kashmir