
गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत ६३ जोडपे लग्नबंधनात अडकले. पण या लग्नसोहळ्याचं आकर्षण ठरल्या त्या इंदू आणि बेला या मायलेकी.
गोरखपूर : एकाच मंडपात आई आणि मुलीचं लग्न. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे. या अनोख्या विवाह सोहळ्याचा साक्षीदार ठरलेल्या मंडपाने दोन पिढ्यांना ७ फेरे घेताना पाहिलं. तसं पाहिलं तर या मंडपात एकूण ६३ विवाह झाले, पण चर्चा फक्त एकाच लग्नाची होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मूळ शहर गोरखपूर येथे एकाच मंडपात आई आणि मुलीचे लग्न झाले. बेला देवी यांनी पहिल्यांदा आपल्या मुलीचं कन्यादान करत आपलं कर्तव्य पार पाडलं. आणि त्यानंतर वधूचा पोशाख परिधान करत मंडपात येऊन जोडीदाराबरोबर बसली. आई आणि मुलीच्या या लग्नाची सगळीकडे चर्चा होत आहे.
- काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचा विजय; 'राज'कारणात शत्रूंचं झालं मनोमिलन
इंदूच्या लग्नानंतर बेलाने घेतले सात फेरे
गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत ६३ जोडपे लग्नबंधनात अडकले. पण या लग्नसोहळ्याचं आकर्षण ठरल्या त्या इंदू आणि बेला या मायलेकी. पिपरौली ब्लॉक येथील रहिवासी असलेल्या या मायलेकींनी आपल्या जोडीदारासह सात फेरे घेतले. महत्त्वाचे म्हणडे, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत बेला देवीने तिच्या पाचपैकी चार मुलांचे लग्न लावून दिले आहे.
याच योजनेंतर्गत तिने छोटी मुलगी इंदूचे पालीच्या राहुलशी लग्न लावले. कन्यादानाचं कर्तव्य पार पाडल्यावर बेलाने याच मंडपात आपलंही लग्न उरकून घेतलं. बेलाने ५५ वर्षीय जगदीशशी लग्न केलं आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात या दोघांनी जीवनसाथी निवडून आयुष्याला नवी सुरुवात केली आहे.
- Farmer Protest: बळीराजाचे मन वळवण्यासाठी भाजपनं आखलाय मोठा प्लॅन
मुला-मुलींच्या लग्नानंतर बेला देवीला एकटं राहणं अवघड वाटत होतं. बेला आणि तिचा साथीदार जगदीश यांनी मुले आणि कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.
- बिअर कंपन्यांकडून मद्यप्रेमींची लूट; हातमिळवणी करून किमतीची फिक्सिंग
२५ वर्षांपूर्वी विधवा झालेल्या बेलाला मिळाला जोडीदार
बेला देवीच्या पतीचं २५ वर्षांपूर्वी निधन झालं होतं. पहिल्या पतीपासून बेलाला दोन मुले आणि तीन मुली आहेत. २५ वर्षांपासून एकटं राहणाऱ्या बेलाने कुटुंबीयांच्या सल्ल्यानुसार तिच्या मेव्हण्याशी लग्न केलं. पिपरौली ब्लॉकमधील कुरमाऊळ येथे राहणारा जगदीश हा तीन भावांमध्ये सर्वात लहान आहे.
शेती करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करणारे ५५ वर्षीय जगदीश हे अविवाहीत आहेत. जेव्हा दोघांना सामूहिक विवाह सोहळ्याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी लग्न करण्याचे ठरविले. आणि मुलीच्या लग्नानंतर या दोघांनीही आपल्या लग्नाचा बार उडवून दिला.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)