मुलाला गोरे करण्यासाठी आईने घासले दगडाने

वृत्तसंस्था
सोमवार, 2 एप्रिल 2018

जेव्हापासून या मुलाला दत्तक घेतले होते, तेव्हापासूनच सुधा या मुलाच्या काळ्या रंगावर नाखूष होत्या. एक वर्षापूर्वी पासून कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मुलाला काळ्या दगडाने घासायला सुरवात केली. दगडाने घासल्यामुळे मुलाचे सर्व अंग सोलवटून जायचे.

भोपाळ : भोपाळमधील निशातपूरा भागातील एका महिलेने आपल्या दत्तक मुलाला दगडाने घासून गोरे करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंबंधी चाईल्ड लाईन व निशातपूरा पोलिसांनी या मुलाची सुटका केली आहे. 

याबाबत महिलेच्या बहिणीची मुलगी शोभना शर्मा हिने तक्रार केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुधा तिवारी या महिलेने दिड वर्षांपूर्वी मुलाला उत्तराखंडमधील मातृछाया संस्थेतून दत्तक घेतले होते. त्यांचे पती एका खासगी रूग्णालयात काम करतात.

तक्रारदार शोभना शर्मा हिच्या सांगण्यानुसार, 'जेव्हापासून या मुलाला दत्तक घेतले होते, तेव्हापासूनच सुधा या मुलाच्या काळ्या रंगावर नाखूष होत्या. एक वर्षापूर्वी पासून कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मुलाला काळ्या दगडाने घासायला सुरवात केली. दगडाने घासल्यामुळे मुलाचे सर्व अंग सोलवटून जायचे. यामुळे मुलाच्या अंगावर अनेक जखमा दिसू लागल्या. मी तिला हा अत्याचार करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला पण तिने न ऐकल्यामुळे पोलिसांना सांगायची वेळ आली.'

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रविवारी मुलाला चाईल्ड लाईन व निशातपूरा पोलिसांनी हमिदीया हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. पुढील चौकशीसाठी मुलाला चाईल्ड लाईनमध्येच ठेवले जाईल. यानंतर बाल कल्याण आयोगाच्या सदस्यांसमोर मुलाची चौकशी होईल. 

Web Title: mother scrubs 5-year-old with stone to make him fair in madhya pradesh