आईने चिमुकलीला रेल्वेखाली फेकले अन्...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

एका मातेने तीन वर्षांच्या चिमुकलीला रेल्वेखाली टाकून दिल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

अजमेर : एका मातेने तीन वर्षांच्या चिमुकलीला रेल्वेखाली टाकून दिल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

राजस्थामधील अजमेर येथील रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये चिमुकलीला रेल्वेखाली टाकून दिल्याचा प्रकार कैद झाला आहे. संबंधित घटना 18 दिवसांपूर्वीची असून, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. मातृत्वाला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना असून, मात न तू वैरीणी... असे म्हणायची वेळ आली आहे.

एक माता आपल्या चिमुकलीला कापडामध्ये गुंडाळून रेल्वे स्थानकावर येते. एक रेल्वे स्थानकावर थांबलेली असते. चिमुकलीला कडेवरून रेल्वे रुळावर टाकून देते आणि बाळाला गुंडाळलेले कापड उचलून निघून जाते. मात्र, बाळाला रेल्वे रुळावर टाकल्यानंतर एकदाही मागे वळून पाहात नाही. महिला घाईघाईने आपली पिशवी उचलते आणि निघून जाते, असे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

दरम्यान, रेल्वे रुळावरून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा रक्षाकांना याबद्दलची माहिती दिली. रेल्वे सुरक्षा रक्षक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रवाशांच्या मदतीने त्यांनी चिमुकलीला रेल्वे रुळावरून बाहेर काढले. चिमुकलीचा जीव वाचला आहे. पण, थोडा उशीर झाला असता तरी चिमुकलीला जीव गमवावा लागला असता. देव तारी त्याला कोण मारी... या म्हणीचा प्रत्येय येथे आला आहे. मात्र, फरार झालेल्या या महिलेचा पोलिस पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother threw 3 years old girl under the train at ajmer railway station