सेल्फीचा मोह अंगाशी; पर्वतावरून पडून गिर्यारोहकाचा मृत्यू

पीटीआय
गुरुवार, 24 जानेवारी 2019

तैपई : कडाक्‍याच्या थंडीत पर्वताच्या शिखरावर बिकिनीवर "सेल्फी' काढणाऱ्या प्रसिद्ध गिर्यारोहक गिगी वू यांचा रविवारी दरीत कोसळून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह आढळून आला असून, खराब वातावरणामुळे तो बाहेर काढण्यात बचाव पथकाला अडचणी येत आहेत. 

तैपई : कडाक्‍याच्या थंडीत पर्वताच्या शिखरावर बिकिनीवर "सेल्फी' काढणाऱ्या प्रसिद्ध गिर्यारोहक गिगी वू यांचा रविवारी दरीत कोसळून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह आढळून आला असून, खराब वातावरणामुळे तो बाहेर काढण्यात बचाव पथकाला अडचणी येत आहेत. 

बिकिनी क्‍लायंबर नावाने प्रसिद्ध असलेल्या गिगी वू (वय 36) या साहसी "सेल्फी'मुळे प्रकाशझोतात आल्या होत्या. पर्वतावर चढाई करत शिखरावर थंड वातावरणातही बिकिनीवर सेल्फी काढण्याची त्यांना हौस होती. गेल्या आठवड्यात त्या तैवानच्या युशान राष्ट्रीय उद्यानातील एका डोंगराकड्यावर गेल्या. या वेळी तापमान दोन अंश सेल्सिअसच्या आसपास होते. थंडीतही चढाई करणाऱ्या गिगी वू या दुर्दैवाने दरीत कोसळल्या. तब्बल 65 ते 100 फुटांवरून कोसळल्याने त्यांच्या कंबरेला जबर मार लागला. त्यामुळे जागेवरून हलताही येत नव्हते.

यासंदर्भात त्यांनी मित्रांना सॅटलाइट फोन करून जखमी झाल्याची कल्पना दिली. मात्र, बचाव पथकाच्या दृष्टिपथात येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी बचावपथक कामाला लागले. मात्र, खराब हवामानामुळे मृतदेहापर्यंत पोचण्यात अडचणी येत होत्या. बर्फाखाली तिचा मृतदेह असल्याचे बचाव पथकाने सांगितले. नैतो कौंटी फायर आणि बचाव पथकाचे अधिकारी लिन चेंग यांनी सांगितले की, पर्वतरांगात सध्या वातावरण खराब असून बचावपथकाला मृतदेह मोकळ्या ठिकाणी नेण्यास सांगितले आहे.

हवामानात सुधारणा झाल्यानंतरच मृतदेह बाहेर आणता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर साहसी सेल्फी प्रसिद्ध करणाऱ्या गिगीच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एका भारतीय कुटुंबाचा गेल्या ऑक्‍टोबरमध्ये कॅलिफोनिर्यातील योशमिते राष्ट्रीय उद्यानात कोसळून मृत्यू झाला होता. 

साहसी गिर्यारोहक गिगी वू 

न्यू तैपई सिटीतील गिगी वू यांनी साहसी सेल्फी काढून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली होती. त्या पवर्तरागांच्या शिखरावर बिकिनी घालून फोटो काढत. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार त्यांनी चार वर्षांत शंभराहून अधिक पवर्तावर चढाई केल्याचे म्हटले होते.

प्रत्येक शिखरावर त्या नवीन बिकिनी घालत असत आणि अशा प्रकारच्या त्यांच्याकडे 97 बिकिनी झाल्या होत्या. यापैकी काही बिकिनी त्यांनी दोनदा घातल्या होत्या. शिखरावर बिकिनी घालण्याच्या आणि सेल्फी काढण्याच्या कृतीतून आपल्याला आनंद मिळतो, असे त्या मुलाखतीत म्हटल्या होत्या. 

Web Title: Mountaineer death due to fall on the mountain trying to Capture Selfie