सुप्रिया सुळे यांनी पीएम केअर फंडावरून सरकारला पकडले कोंडीत  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

बेरोजगारी, देशाची ढासळती अर्थव्यवस्था आदी मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल सरकारला घेरले होते. आजही त्यांनी कोरोनाबाबतच्या उपाययोजना, पीएम केअर फंड, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले भाव आदी मुद्द्यांवर सरकारला खडे बोल सुनावले. 

नवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षाकडून सातत्याने विचारणा होत असलेल्या पीएम केअर फंडाबाबतही त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे त्यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची सभागृहाला आठवण करून दिली. 

...तर कांदा निर्यातबंदीचा फेरविचार

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या अधिवेशनात पहिल्याच दिवसापासून विरोधी गट आक्रमक भूमिकेत दिसला आहे. बेरोजगारी, देशाची ढासळती अर्थव्यवस्था आदी मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरले होते. आजही त्यांनी कोरोनाबाबतच्या उपाययोजना, पीएम केअर फंड, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले भाव आदी मुद्द्यांवर सरकारला खडे बोल सुनावले. 

पाकच्या खोडसाळपणार अजित डोवाल चिडले

 

लोकसभेत आज संसद सदस्यांचे पगार, अलाऊन्सेस व पेन्शन (सुधारणा) विधेयक २०२० या विषयांवर बोलताना खासदारांच्या वेतनात होणाऱ्या कपातीचे खासदार सुळे यांनी समर्थन केले. देशातील सध्याची स्थिती पाहता ही कपात योग्य असून, त्याला आमचे पूर्ण समर्थन असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत त्यांनी सभागृहाला माजी राष्ट्रपती स्व. प्रणब मुखर्जी यांची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, मुखर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री असताना सर्वच खात्यांना अनावश्यक खर्च टाळून जास्तीत जास्त काटकसर करण्याच्या सक्त सूचना दिल्या आणि त्या अमलात देखील आणल्या होत्या. त्यातून मोठ्या प्रमाणावर बचत झाली. आताच्या परिस्थितीत सरकार अतिरिक्त खर्च टाळून काटकसर करण्याबाबत का विचार करीत नाही, अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली. 

 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम केअर फंडाबाबतही सुप्रिया सुळे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. देशात 'पंतप्रधान सहाय्यता निधी'सारखी मजबूत व्यवस्था असताना 'पीएम केअर फंड' का सुरु करण्यात आला, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. पीएम केअरबाबत कसलेही प्रश्न उपस्थित करण्याची सोय या सरकारने ठेवली नाही, ही अशी गोपनीयता का पाळली जातेय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, याबाबत पारदर्शकता आणावी लागेल, असे सभागृहाला सांगितले. 

पेट्रोल- डिझेलचे भाव वाढत असल्याबाबतही सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली. सरकार सर्वच प्रकारच्या सबसीडींमध्ये कपात करीत आहे. परंतु, जगभरात कच्च्या तेलाचे भाव कोसळत असताना भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव का वाढत आहेत, अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली. आम्ही सर्व खासदार अगदी आनंदाने आमचे मानधन देतोय. एवढंच नाही तर 'खासदार फंडा'तून देण्यात येणारा निधी इतरत्र वळविण्यापेक्षा तो व्हेंटिलेटर, रुग्णालयांमध्ये खाटा वाढविणे, आरोग्यसज्जता यासाठी खासदारांनी आपापल्या मतदारसंघात खर्च करावा, अशी सूचना त्यांनी केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule criticizes the central government