खासदाराच्या सचिवाला हेरगिरीप्रकरणी अटक

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाच्या एका खासदाराच्या खासगी सचिवाला दिल्ली पोलिसांनी आज हेरगिरीप्रकरणी अटक केली आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील कर्मचारी महमूद अख्तरला ज्या हेरगिरी प्रकरणावरून देशाबाहेर हाकलून दिले होते, त्याच प्रकरणी ही कारवाई झाली आहे.

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाच्या एका खासदाराच्या खासगी सचिवाला दिल्ली पोलिसांनी आज हेरगिरीप्रकरणी अटक केली आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील कर्मचारी महमूद अख्तरला ज्या हेरगिरी प्रकरणावरून देशाबाहेर हाकलून दिले होते, त्याच प्रकरणी ही कारवाई झाली आहे.

"सप'चे राज्यसभेतील खासदार मुनव्वर सलीम यांचा खासगी सचिव असलेल्या फरहात याला पोलिसांनी काल (ता. 28) रात्री ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. चौकशीनंतर आज त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हेरगिरी करणाऱ्या टोळीचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली असून अख्तरच्या संपर्कात असलेल्या आणखीही काही जणांना अटक करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. दरम्यान, हकालपट्टी करण्यापूर्वी महमूद अख्तर याच्या झालेल्या चौकशीत त्याने फरहातचे "जवळचा सहकारी' म्हणून नाव घेतले होते आणि यावरूनच फरहातला अटक झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. फरहातला काल रात्री सलीम यांच्या निवासस्थानामधून ताब्यात घेण्यात आले होते. महमूद हा फरहातचे नाव सांगत असतानाचा व्हिडिओही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. महमूद याने सईद फारूख, खादीम हुसेन, शाहिद इक्‍बाल आणि इक्‍बाल चिमा यांचेही "पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी' म्हणून नाव घेतले आहे.

याबाबत खासदार मुनव्वर सलीम यांच्याकडे विचारणा केली असता, नियुक्तीच्या वेळेस फरहातची पार्श्‍वभूमी तपासून पाहिली होती, असे त्यांनी सांगितले. "त्याने आधीही इतर खासदारांकडे काम केले होते. या प्रकरणी होणाऱ्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करेन. फरहातच्या अटकेबाबत राज्यसभेला कळविण्यात आले असून त्याची सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांकडे सोपविण्यात येतील,' असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title: MP's secretary arrested for espionage