पुलवामाचा सूत्रधार मुदासीर अहमद खान गाडी, स्फोटकांची केली होती व्यवस्था 

पीटीआय
सोमवार, 11 मार्च 2019

श्रीनगर (पीटीआय) : जैशे महंमदचा दहशतवादी मुदासीर अहमद खान ऊर्फ महंमदभाई याने पुलवामा हल्ल्याच्या कटाचे संपूर्ण नियोजन केल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चाळीस जवान हुतात्मा झाले होते. पुलवामा हल्ल्याचा तपास करताना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर मुदासीर अहमद खानचे (वय 23) नाव पुढे आले आहे.
 

श्रीनगर (पीटीआय) : जैशे महंमदचा दहशतवादी मुदासीर अहमद खान ऊर्फ महंमदभाई याने पुलवामा हल्ल्याच्या कटाचे संपूर्ण नियोजन केल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चाळीस जवान हुतात्मा झाले होते. पुलवामा हल्ल्याचा तपास करताना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर मुदासीर अहमद खानचे (वय 23) नाव पुढे आले आहे.
 
मुदासीर हा पुलवामाचाच रहिवासी असून, पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मुदासीरने एक वर्षाचा इलेक्‍ट्रिशिअनचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मुदासीरनेच हल्ल्यात वापरलेली गाडी आणि स्फोटकांची जमवाजमव केली होती. पुलवामातील त्राल भागात राहणारा मुदासीर 2017 मध्ये जैशे महंमद संघटनेचा सदस्य बनला होता. काश्‍मीर खोऱ्यात जैशे महंमदचा पुन्हा दबदबा निर्माण करणाऱ्या नूर महंमद तांत्रे याच्या गटात तो नंतर सहभागी झाला. सुरक्षा जवानांनी डिसेंबर 2017 मध्ये तांत्रेला मारल्यानंतर मुदासीर गेल्या वर्षी 14 जानेवारीपासून घरातून गायब झाला आणि दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाला होता.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा हल्ल्यावेळी लष्कराच्या वाहनावर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळविणारा आत्मघातकी दहशतवादी अदिल अहमद दार हा मुदासीरच्या कायम संपर्कात होता. फेब्रुवारी 2018 ला सुंजवान येथील लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यामध्येही त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. या हल्ल्यात सहा जवान हुतात्मा झाले होते. जानेवारी 2018 मध्ये लेथपोरो येथे सीआरपीएफच्या छावणीवरील हल्ल्यातही त्याचा सहभाग होता.
 

पुलवामातील हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने 27 फेब्रुवारीला मुदासीरच्या घरी तपास केला होता. मुदासीरने पुलवामा हल्ल्यासाठी मारुती इको मिनी व्हॅन मिळविली होती. हल्ल्याच्या दहाच दिवस आधी ही गाडी त्याला दुसऱ्या एका दहशतवाद्याने आणून दिली होती. सध्या फरार असलेला जैशे महंमदचा दहशतवादी सज्जाद भट हादेखील आता सक्रिय झाल्याचा अंदाज आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mudasir ahmad khan was mastermind for pulwama terrorist attack