मुलायमसिंह यांनी उघड केली बसपवरील नाराजी; म्हणाले...

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष-बहुजन समाजवादी पक्षांच्या युतीवर सपचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी आज जाहीर नाराजी व्यक्त केली. बसपला लोकसभेच्या निम्म्या जागा कशा दिल्या, अशी विचारणा त्यांनी पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांना केली आहे. 

लोकसभा 2019 ः लखनौ ः उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष-बहुजन समाजवादी पक्षांच्या युतीवर सपचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी आज जाहीर नाराजी व्यक्त केली. बसपला लोकसभेच्या निम्म्या जागा कशा दिल्या, अशी विचारणा त्यांनी पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांना केली आहे. 

संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुलायमसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा सत्तेवर यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून विरोधकांना धक्का दिला होता. त्यापाठोपाठ आता त्यांनी बसपबरोबरच्या युतीवरून मुलावरच टीका केली आहे. केवळ टीका करूनच मुलायमसिंह थांबले नाहीत, तर आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी हवी असेल, तर त्यांनी माझ्याकडे यावे. अखिलेश यांचा कोणताही निर्णय मी बदलू शकतो; असे ते म्हणाले. पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांबरोबर बोलताना त्यांनी हा पवित्रा घेतला.

जानेवारी महिन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश आणि बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दोन्ही पक्ष लोकसभेच्या प्रत्येकी 38 जागा लढविणार असल्याचे जाहीर केले होते. आज जारी करण्यात आलेल्या यादीत मात्र सप 37 आणि बसप 38 जागा लढविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचा संदर्भ पकडून मुलायमसिंह यांनी नाराजी व्यक्त केली आणि सप जास्त भक्कम असताना निम्म्या जागाच का लढवाव्यात, असा प्रश्‍न केला. भाजपची निवडणूक तयारी सप-बसप युतीपेक्षा जास्त चांगली असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. उमेदवारांची यादी लवकरात लवकर जाहीर केल्यास, प्रचाराला पुरेसा वेळ मिळेल असे सांगून, इच्छुकांनी मला भेटावे, असे ते म्हणाले. अखिलेश यांनी दिलेली उमेदवारी मी बदलू शकतो, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mulayam criticises Akhilesh Yadavs seat sharing agreement with mayawati