गोव्यात लोकशाहीचा आणखी एक खून : शिवसेना

टीम ई सकाळ
बुधवार, 15 मार्च 2017

भाजपच्या मुख्यमंत्री पार्सेकरांसह अर्धा डझन विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला, पण सर्वात मोठय़ा पक्षाला सरकार स्थापनेची संधी न देता 13 आमदारांच्या ‘गटा’ने अपक्ष व इतरांसह गोव्यात सरकार स्थापनेचा दावा केला

मुंबई : काँग्रेस सुस्त राहिली म्हणून भाजपविरोधात निवडून आलेले पक्ष भाजपच्याच घोडेबाजारात सामील झाले आणि मंगळवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांचा शपथविधीही पार पडला. सत्तेसाठी गोव्यात जी राजकीय धुळवड खेळली गेली तिला लोकशाहीचा खून याशिवाय वेगळे काही म्हणता येणार नाही, अशी परखड टीका शिवसेनेने केली आहे. 

गोव्याच्या जनतेने काँग्रेसला १७ जागा देऊन मोठा पक्ष म्हणून निवडून आणले. हा पराभव नक्की कोणाचा?, असा सवाल शिवसेनेने 'सामना'तून उपस्थित केला आहे.
गोव्याच्या जनतेने काँग्रेसला बहुमताच्या जवळ नेऊन ठेवले. मुख्यमंत्री पार्सेकरांसह अर्धा डझन विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला, पण सर्वात मोठय़ा पक्षाला सरकार स्थापनेची संधी न देता 13 आमदारांच्या ‘गटा’ने अपक्ष व इतरांसह गोव्यात सरकार स्थापनेचा दावा केला, असा मुद्दा शिवसेनेने उपस्थित करीत काँग्रेसचे समर्थन केले आहे.

"गोव्यात लोकशाहीचा असा खून गोव्यात अनेकदा झाला आहे. त्यात आणखी एका खुनाची भर पडली. खून पचवायची शक्ती आमच्या लोकशाहीला मिळो," असा सणसणीत टोला सेनेने भाजपला हाणला आहे. 

हार कर जितनेवाले को बाजीगर कहते है!
और जितकर हारनेवाले को काँग्रेस कहते है!
और बिना इलेक्शन जिते हुए सीएम बननेवाले को पर्रीकर कहते है!

हा सोशल मीडियावर फिरणारा मेसेजही शिवसेनेने आवर्जून शेअर केलाय.

हा एक ‘फिक्स’ विनोदच 
'सामना'ने म्हटले आहे की, 'ज्यांना भाजपच्या विरोधात जनेतेने कौल दिला आहे त्यांच्याच पाठिंब्यावर पर्रीकर सरकार बनवत आहेत.  गोव्यातील भाजप सरकारविरोधात संताप होता व या सगळ्या आमदारांनी भाजप उमेदवारांचा पराभव करून विजय प्राप्त केला आहे हे ‘मगो’चे ढवळीकर आणि स्वतः मनोहर पर्रीकर यांनी लक्षात घ्यायला हवे. एवढेच कशाला, गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे विजय सरदेसाई यांना प्रचार काळात पर्रीकर हे ‘फिक्सर’ म्हणायचे. आता त्याच सरदेसाई यांनी पर्रीकर यांचे मुख्यमंत्रीपद ‘फिक्स’ करावे हा एक विनोदच म्हणावा लागेल.'

Web Title: murder of decmocracy in goa, shiv sena slams bjp