काँग्रेस नगरसेवक सैफुल्ला खान लढणार मुरगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

येत्या बुधवारी (ता. 26) होऊ घातलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या गटातून काॅंग्रेसचे नगरसेवक सैफुल्ला खान हे आमचे उमेदवार असतील असे मावळते भाजप नगराध्यक्ष क्रितेश गांवकर यांनी स्पष्ट केले.

मुरगाव : येत्या बुधवारी (ता. 26) होऊ घातलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या गटातून काॅंग्रेसचे नगरसेवक सैफुल्ला खान हे आमचे उमेदवार असतील असे मावळते भाजप नगराध्यक्ष क्रितेश गांवकर यांनी स्पष्ट केले. आपल्यानंतर नगराध्यक्षपदावर श्री खान यांना आसनावर विराजमान केले जाईल असे आश्वासन आपण त्यांना दिले होते. त्यानूसार आमच्या गटाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे गांवकर यांनी सांगितले.

मुरगाव नगरपालिकेची सत्ता बळकाविण्यासाठी भाजपाच्या दोन आमदारांमध्ये तुल्यबळ लढाई लागली आहे. सध्या आमदार कार्लूस आल्मेदा यांच्याकडे बहुमत झुकलेले आहे. त्यामुळे नगरविकास मंत्री मिलिंद नाईक तोंडघशी पडले आहेत. कोणत्याही परीस्थितीत हातातून निसटलेली सत्ता पुन्हा बळकाविण्याचा डाव मंत्री गटांकडून मोठ्या हुशारीने खेळला जात आहे. त्यासाठी आमदार कार्लूस गटातील नगरसेवकांना गळ घालण्यात येत आहे पण अजून कोणीच गळाला लागलेले नाही.

मावळते नगराध्यक्ष क्रितेश गांवकर यांनी आमदार कार्लूस आल्मेदा यांना चारीमुंड्या चीत करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली आहे. त्याचसाठी त्यांनी काॅंग्रेसच्या सैफुल्ला खान यांचे नाव पुढे केले आहे. आमचे 12 नगरसेवक एकसंध आहेत, नगराध्यक्ष काॅंग्रेस पक्षाचा देण्यास मंत्री मिलिंद नाईक गटातील नगरसेवक राजी झाले आहेत, त्यामुळे आता आमदार कार्लूस आल्मेदा गटात सामील झालेल्या काॅंग्रेस समर्थक नगरसेवकांनी श्री खान यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुरगाव पालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे पण त्यांच्यात दोन गट पडले आहे. त्यामुळे भाजपच्या या दोन्ही आमदारांना पालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काॅंग्रेस, राष्ट्रवादी,मगो आणि अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा घ्यावा लागतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murgaon Munciple Council Corporation election