मुस्लिम खासदारांचा टक्का वाढला; सत्तावीस मुस्लिम खासदार

पीटीआय
शनिवार, 25 मे 2019

मागील दशकभरामध्ये प्रथमच यंदा लोकसभेतील मुस्लिम खासदारांची संख्या 27 वर पोचली आहे, मागील खेपेस ती 23 एवढी होती.

नवी दिल्ली : मागील दशकभरामध्ये प्रथमच यंदा लोकसभेतील मुस्लिम खासदारांची संख्या 27 वर पोचली आहे, मागील खेपेस ती 23 एवढी होती. उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून सर्वाधिक मुस्लिम खासदार निवडून आले असून, ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपने मात्र येथे मुस्लिम नेतृत्वाला डावलेले दिसते.

निवडणुकीमध्ये विजय मिळवणाऱ्या स्टार उमेदवारांमध्ये "नॅशनल कॉन्फरन्स'चे नेते फारुख अब्दुल्ला, "एमआयएम'चे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा समावेश आहे. यूपी आणि पश्‍चिम बंगालमधून सहा मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत. केरळ आणि जम्मू-काश्‍मीरमधून प्रत्येकी तीन मुस्लिम खासदार निवडून आले असून, आसाम आणि बिहारमधून दोघेजण विजयी झाले आहेत. पंजाब, महाराष्ट्र, तमिळनाडू, लक्षद्वीप आणि तेलंगणामधून प्रत्येकी एक खासदार विजयी झाला आहे.

राजकीय पक्षांचा विचार केला तर या खेपेस तृणमूल कॉंग्रेसचे पाच मुस्लिम खासदार असून, त्यापाठोपाठ कॉंग्रेसचा क्रमांक लागतो, कॉंग्रेसचे चार खासदार निवडून आले आहेत. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स आणि इंडियन मुस्लिम लीगचे प्रत्येकी तीन खासदार संसदेत पोचले आहेत. एमआयएमचे या वेळेस दोन खासदार संसदेत गेले आहेत.

रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट आणि बद्रुद्दीन अजमल यांचा पक्ष "एआययूडीएफ'चा प्रत्येकी एक खासदार संसदेत पोचल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim Community Women MP Majority increased in Loksabha