दीड वर्षात 'तोंडी तलाक' संपवू: मुस्लिम बोर्ड

पीटीआय
बुधवार, 12 एप्रिल 2017

तोंडी तलाकची प्रथा स्त्रियांसाठी अन्यायकारी असली तरीसुद्धा, तो समाजाचा अंतर्गत प्रश्‍न आहे, पुढील दीड वर्षात यावर तोडगा काढला जाईल. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करू नये

बिजनौर - आगामी दीड वर्षामध्ये आम्ही 'तोंडी तलाक'ची प्रथा संपुष्टात आणू. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करू नये, असे विधान 'अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा'चे उपाध्यक्ष कल्बे सादिक यांनी केले आहे. याशिवाय सादिक यांनी मुस्लिमांनी गोमांस सेवनापासून दूर राहावे, असाही सल्ला दिला आहे. जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.

तोंडी तलाकची प्रथा स्त्रियांसाठी अन्यायकारी असली तरीसुद्धा, तो समाजाचा अंतर्गत प्रश्‍न आहे, पुढील दीड वर्षात यावर तोडगा काढला जाईल. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

गोमांस सेवनाच्या मुद्‌द्‌यावर ते म्हणाले की, कोणत्याही धार्मिक ग्रंथामध्ये गोमांस सेवनाचा सल्ला देण्यात आलेला नाही. त्यामुळे मुस्लिमांनी यापासून दूर राहावे. सरकारने गोहत्या बंदी कायदा लागू करत, गोमांस सेवनासही मज्जाव केला तर मुस्लिम समाज याचे स्वागतच करेल. तूर्तास गोरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा कृत्यांना सरकारने पायबंद घालावा, अशी मागणीही त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Muslim Law Board to end triple talaq in 1.5 years'