उत्कल एक्‍स्प्रेस घसरून २३ ठार; ६० जखमी

पीटीआय
रविवार, 20 ऑगस्ट 2017

मुझफ्फरनगरजवळ १४ डबे रुळावरून खाली

मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील खतौलीजवळ (जि. मुझफ्फरनगर) शनिवारी (ता. १९) पुरी-हरिद्वार उत्कल एक्‍स्प्रेस या गाडीचे १४ डबे रेल्वे रुळांवरून घसरल्यामुळे झालेल्या अपघातात २३ प्रवासी मृत्युमुखी पडले असून, सुमारे ६० पेक्षा अधिक  जण जखमी झाल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आनंद कुमार यांनी दिली. जखमींची संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

उत्कल एक्‍स्प्रेसचे १४ डबे शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास रेल्वे रुळांवरून घसरले. मात्र, या अपघाताबाबत अधिक माहिती रेल्वेकडून लगेचच उपलब्ध होऊ शकली नाही. १४ डबे रेल्वे रुळांवरून घसरल्यानंतर ते शेजारी असलेल्या घरांवर धडकले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजधानी दिल्लीपासून शंभर किलोमीटर अंतरावर मुझफ्फरनगरमधील खतौलीजवळ हा अपघात झाला. ओडिशातील पुरी येथून निघालेली ही रेल्वे गाडी उत्तराखंडमधील हरिद्वारच्या दिशेने जात होती. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘ट्विट’वर म्हटले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून, दिल्लीहून राष्ट्रीय आपत्तीनिवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक रवाना झाले आहे. अपघातामुळे या लोहमार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. अपघातानंतर मुझफ्फरनगरसह शेजारील जिल्ह्यातील रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, दिल्लीतून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत.

मुझफ्फरनगरमधील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. रेल्वे मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकारकडून आवश्‍यक ती सर्व मदत पुरविण्यात येईल. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: muzaffarnagar national news uatkal express accident