हौतात्म्याचा बदला घेणाऱया गर्भवती पत्नीला अश्रू अनावर

Martyr Ajay Kumar
Martyr Ajay Kumar

मेरठ: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी रशीद याला ठार करण्यात लष्कर व पोलिसांना आज (सोमवार) यश आले. या कारवाईत एक मेजर आणि चार जवानांना वीरमरण आले असून, यामध्ये मेरठचे जवान अजय कुमार यांचाही समावेश आहे. 40 जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेणाऱया अजय कुमार यांची पत्नी गर्भवती असून, त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

अजय कुमार (वय 26) हे मेरठच्या जानी भागातील बसा टिकरी गावचे रहिवासी होते. 7 एप्रिल 2011 रोजी ते सैन्यात दाखल झाले. यानंतर 55 राष्ट्रीय रायफल्स रॅपिड अॅक्शन फोर्समध्ये त्यांची निवड झाली. काही महिन्यांपूर्वीच त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होण्याचे आदेश मिळाले. चार वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून, त्यांना एक अडीच वर्षांचा मुलगा आहे. तर त्यांची पत्नी सध्या आठ महिन्यांची गर्भवती आहे. अजय कुमार हे महिन्याभराच्या सुट्टीनंतर 30 जानेवारीला सेवेत रुजू झाले होते. कालच (रविवार) त्यांचे पत्नीसोबत फोनवरुन बोलणे झाले होते. पाच महिन्यांपूर्वीच अजय यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले आहे. त्यामुळे अवघ्या 5 महिन्यांमध्येच कुमार कुटुंबीयांवर दुसरा आघात झाला आहे. अजय यांचे वडील वीरपाल यांनीही सैन्यात सेवा केली आहे.

अजय कुमार हे हुतात्मा झाल्याची माहिती गावात समजताच अनेकांना अश्रू अनावर झाले. अजय कुमार यांचे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे. मुलाच्या मृत्यूची माहिती समजताच वीरपाल यांना धक्का बसला. त्यावेळी नातू आरव त्यांच्या मांडीवर बसला होता. घरात जमणाऱ्या गर्दीकडे तो पाहत होता. 'माझ्या मुलाने 40 जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेतला आहे,' अशी भावना अजय यांच्या वडिलांनी बोलून दाखवली.

दरम्यान, पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुतात्मा करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला आहे. दहशतवादी लपलेले घरच लष्कराने उडवून देत नया हिंदुस्तानची झलक दाखविली आहे. भारतीय जवानांनी पुलवामा हल्ल्याचा बदला घेत जैशे महंमदचा म्होरक्या अब्दुल रशीद गाझी याच्यासह दोन दहशतवाद्यांना ठार केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com