माय व्होट टुडे'चे अकाउंट ब्लॉक ; ट्विटरची कारवाई

पीटीआय
बुधवार, 11 जुलै 2018

भारतातील अनेक बॉट्‌स, ट्रोल्स आणि बनावट अकाउंटही ट्विटरने बंद केली आहेत. "माय व्होट टुडे' ऍपच्या हॅंडलवर दिलेल्या माहितीनुसार, हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पोलिंग ऍप असून, भारत सरकारशी त्याची संशोधन भागीदारी आहे.

नवी दिल्ली : "माय व्होट टुडे' या पोलिंग ऍपचे हॅंडल ट्विटरने बंद केले आहे. या ऍपने घेतलेल्या वादग्रस्त "पोल'मुळे ट्विटरने ही कारवाई केली आहे. तसेच, भारतातील अनेक बॉट्‌स, ट्रोल्स आणि बनावट अकाउंटही ट्विटरने बंद केली आहेत. 
"माय व्होट टुडे' ऍपच्या हॅंडलवर दिलेल्या माहितीनुसार, हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पोलिंग ऍप असून, भारत सरकारशी त्याची संशोधन भागीदारी आहे. 

बंगळूरस्थित ऍप्शन डिजिटल टेक्‍नॉलॉजीज आणि कॅलिफोर्नियातील पाउलो अल्टोस्थित ऍप्शन डिजिटल या कंपन्यांनी हे ऍप विकसित केले आहे. या ऍपने नुकताच भारतातील कोणत्या शत्रूंचा आवाज बंद करावा, असा "पोल' घेतला होता. या "पोल'मध्ये सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्तींच्या नावांचे पर्याय देण्यात आले होते. यामध्ये पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, पी. चिदंबरम, सलमान खुर्शिद, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक पत्रकार, प्राध्यापक, कलाकार, विद्यार्थी आणि फुटीरतावादी नेत्यांची नावे होती. 

ट्विटरच्या प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीनुसार, एखादा व्यक्तीचा आवाज बंद करण्याचा पोल म्हणजे दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. "माय व्होट टुडे'सह या ऍपच्या 27 प्रवर्तकांची अकाउंट बंद करण्यात आली आहेत. ट्विटरच्या नियमांचा भंग होत असल्यानेही अकाउंट बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, भारतात नेमकी किती बॉट्‌स, ट्रोल्स आणि बनावट अकाउंट बंद करण्यात आली याची माहिती प्रवक्‍त्याने दिली नाही. 

Web Title: My Vote Todays Account Block action by Twitter