अक्षय कुमार, साईना यांच्यामुळे नक्षल्यांचा तिळपापड...

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मे 2017

सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या 12 जवानांच्या कुटूंबीयांना मदत म्हणून अभिनेता अक्षय कुमार याने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीने प्रत्येक कुटूंबास 9 लाख रुपये या प्रमाणे आर्थिक सहाय्य केले आहे. याचबरोबर, बॅडमिंटनपटू साईना नेहवालनेही या कुटूंबांस प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत केली आहे. प्रसिद्ध फलंदाज गौतम गंभीर यानेही या हुतात्म्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची घोषणा केली आहे

नागपूर - छत्तीसगड राज्यामधील सुकमा जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत केल्यासंदर्भात अभिनेता अक्षय कुमार व बॅडमिंटनपटू साईना नेहवाल यांच्यावर नक्षलवाद्यांनी "टीका' केली आहे.

अभिनेते वा इतर क्षेत्रांमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांनी सीआरपीएफच्या बाजुने उभे न राहता ज्यांच्या मानवाधिकारांची पायमल्ली केली जात आहे, अशा आदिवासींना पाठिंबा द्यावयास हवा, असा कांगावा नक्षलवाद्यांनी केला आहे. "राजकीय नेते व उद्योगपती यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेले सीआरपीएफचे जवान हे काही देशासाठी हुतात्मा झालेले नाहीत. येथील स्थानिक जनतेचे सतत शोषण करणाऱ्या या जवानांना पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीने शासन केले आहे,' असा दावा बस्तर येथे आढळलेल्या नक्षल्यांच्या पत्रकामध्ये करण्यात आला आहे.

सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या 12 जवानांच्या कुटूंबीयांना मदत म्हणून अभिनेता अक्षय कुमार याने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीने प्रत्येक कुटूंबास 9 लाख रुपये या प्रमाणे आर्थिक सहाय्य केले आहे. याचबरोबर, बॅडमिंटनपटू साईना नेहवालनेही या कुटूंबांस प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत केली आहे. प्रसिद्ध फलंदाज गौतम गंभीर यानेही या हुतात्म्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची घोषणा केली आहे.

अशा प्रकारे हुतात्म्यांच्या कुटूंबीयांना आदरपूर्वक मदत केली जात असताना नक्षल्यांचा मात्र संतापाने तिळपापड झाला आहे. निमलष्करी दलांकडून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आदिवासींचे शोषण करण्यात येत असल्याचा कांगावा नक्षलवाद्यांकडून करण्यात आला आहे. ""आता खेळाडू, कलाकार व बुद्धिमंतांनी हुतात्म्यांच्या कुटूंबीयांना मदत करण्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे नक्षलवाद्यांच्या समाजामधील प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत असल्याच्या धारणेमुळे त्यांच्याकडून ही टीका करण्यात आली आहे,'' असे मत एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केले आहे.

Web Title: Nagpur News:Maoists criticize Akshay Kumar, Saina Nehwal