नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी भटकर

टीम ईसकाळ
शनिवार, 28 जानेवारी 2017

भटकर यांनी भारत सरकारच्या विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सीएसआरच्या गव्हर्निंग कौन्सिलचेही ते सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या ई गव्हर्नन्स समितीवर त्यांनी काम केले आहे. देशातील आघाडीच्या विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक संस्थांवर ते काम करीत आहेत. पद्मभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी त्यांना भारत आणि महाराष्ट्र सरकारने यापूर्वी गौरविले आहे. भटकर यांनी 12 पुस्तके आणि 80 शोधनिबंध लिहिले आहेत. सध्या ते इंडिया इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलपती आहेत.

पाटणाः बिहारमधील नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्रसिद्ध संशोधक आणि 'परम' सुपरकॉम्प्युटरचे (परम संगणक) निर्माते डॉ. विजय भटकर यांची नियुक्ती झाली. नालंदा विद्यापीठाच्या वेबसाईटवर तशी घोषणा केली आहे.

भटकर यांची 25 जानेवारीपासून नियुक्ती झाल्याचे वेबसाईटवर म्हटले आहे. कुलगुरू म्हणून भटकर तीन वर्षे काम पाहतील. सुपरकॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱया सी-डॅक विभागाच्या स्थापनेत भटकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्याशिवाय त्यांनी ईआर अँड डीसी, आआयआयटीएम-के, आय2आयटी, ईटीएच रिचर्स लॅब, एमकेसीएल आणि इंडिया इंटरनॅशनल मल्टियुनिव्हर्सिटी अशा राष्ट्रीय संस्थांच्या स्थापनेतही प्रमुख सहभाग नोंदवला आहे.

भटकर यांनी भारत सरकारच्या विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सीएसआरच्या गव्हर्निंग कौन्सिलचेही ते सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या ई गव्हर्नन्स समितीवर त्यांनी काम केले आहे. देशातील आघाडीच्या विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक संस्थांवर ते काम करीत आहेत. पद्मभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी त्यांना भारत आणि महाराष्ट्र सरकारने यापूर्वी गौरविले आहे. भटकर यांनी 12 पुस्तके आणि 80 शोधनिबंध लिहिले आहेत. सध्या ते इंडिया इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलपती आहेत.

नालंदाचे मावळते प्रभारी कुलगुरू प्रा. पंकज मोहन यांनी भटकर यांचे अभिनंदन करताना 'आपले नेतृत्व, मार्गदर्शन आणि दुरदृष्टी यामुळे नालंदा विद्यापीठ परंपरा आणि आधुनिकता, वारसा आणि विकास यामधील दुव्याचे काम करण्याचे उद्दीष्ट साध्य करेल,' असा विश्वास व्यक्त केला.

नालंदा विद्यापीठाविषयी...
नालंदा विद्यापीठाचा विद्ध्वंस झाल्यानंतर आठ शतकांनी विद्यापीठाची पुनर्उभारणी करण्यात आली. मार्च 2006 मध्ये तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी बिहार विधानसभेत बोलताना पुनर्उभारणीची संकल्पना मांडली. सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज येओ यांनी तत्काळ 'नालंदा प्रस्ताव' केंद्र सरकारकडे पाठविला. या प्रस्तावानंतर नालंदा विद्यापीठाची पुनर्स्थापना करण्यात आली. बिहार सरकारने नालंदा विद्यीपाठाच्या पुनर्उभारणीची संकल्पना उचलून धरत राजगिरजवळ 450 जागा निश्चित केली.

मुळ नालंदा विद्यीपाठाची उभारणी प्राचीन भारतातील मगध साम्राज्याच्या काळात झाली. इसवी सन पाचशे ते इसवी सन बाराशे या आठशे वर्षांच्या काळात नालंदा विद्यापीठ अस्तित्वात होते. विद्यीपाठात सुमारे दोन हजारांवर शिक्षक आणि दहा हजारांवर विद्यार्थी शिकत होते. चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, टर्की, श्रीलंका आणि दक्षिण-पूर्व आफ्रिका या भागातून बुद्धिवंत शिकण्यासाठी नालंदात येत असत. ह्युआँग साँग या चीनी प्रवाश्याने नालंदाबद्दल तपशिलवार लिहून ठेवले आहे. बाराव्या शतकात परकीय आक्रमकांनी नालंदाचा विद्ध्वंस केला.

नालंदा विद्यापीठ पूर्व आणि पश्चिम जगाचा दुवा होता. नालंदा नष्ट होण्यापूर्वी जगामध्ये नालंदाशिवाय केवळ चार विद्यीपाठे होते. त्यामध्ये कैरोमधील अल् अझहर (स्थापना इसवी सन 972), इटलीमधील बोलोगना (स्थापन इसवी सन 1088) आणि ब्रिटनमधील ऑक्सफर्ड (स्थापन इसवी सन 1167) यांचा समावेश होता.

Web Title: Nalanda University gets new Chancellor