esakal | ‘नमामी गंगा २.०’ पुढील महिन्यापासून
sakal

बोलून बातमी शोधा

desh

‘नमामी गंगा २.०’ पुढील महिन्यापासून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जीवनदायिनी गंगा आणि तिच्या साहाय्यक नद्या यांची स्वच्छता व निर्मलता टिकविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘नमामी गंगे’ योजनेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ जास्तीत जास्त पुढच्या महिन्यात या योजनेला हिरवा कंदील दाखविला जाईल, अशी चिन्हे आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू होणाऱ्या नमामी गंगेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रामुख्याने हेच राज्य तसेच, बिहारमधील काही भागाची निवड करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो मृतदेह गंगेच्या पाण्यावर तरंगत असल्याने सरकारची जगभरात नाचक्की झाली होती.

सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन अंतर्गत ‘नमामी गंगे’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची जोरदार तयारी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात गंगेसह यमुना, काली या नद्या तसेच गंगेच्या उपनद्या यांच्या स्वच्छता आणि त्यावरील प्रकल्पांच्या देखभाल याकडेही विशेष भर देण्यात येणार आहे. या संपूर्ण योजनेच्या आराखड्याला अंतिम रूप दिले जात असून सध्या आर्थिक अनुदानाबाबतचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे आहे. मंत्रालयाच्या उच्चाधिकार समितीने (ईएफसी) त्यावर नुकताच सखोल विचार विनिमय केला आहे. त्याची छाननी होऊन अर्थमंत्रालयाने हिरवा कंदील दाखवताच योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर जाईल.

नमामी गंगे परियोजना गंगा आणि तिच्या उपनद्या यांच्यासाठी आणखी पाच वर्षांसाठी मुदतवाढीसह लागू करण्याची ही योजना आहे. १३ मे २०१५ रोजी मोदी सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेत आतापावेतो पूर्ण झालेल्या परियोजनांचा आढावा आणि देखरेख यावरही दुसऱ्या टप्प्याच्या योजनेत विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

नमामी गंगे - १ साठी केंद्र सरकारने २० हजार कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. आतापावेतो या योजनेसाठी ३०,२५५ कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी ११,८४२ कोटी रुपये प्रत्यक्ष खर्च झाले आहेत. या योजनेसाठीचे अनुदान थेट बॅंक खात्यावर संबंधितांकडे वळते करण्यात येत आहे.

loading image
go to top