'मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

- नाना पटोले यांचा आरोप
- आयुध निर्माणी मध्ये खाजगीकरणाला विरोध

मुंबई : देशभरात खाजगीकरणाचा सपाटा लावलेल्या भाजप सरकारने आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत आयुध निर्माणी संस्थांमध्ये सुद्धा खाजगीकरणाचा डाव रचला आहे. या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे. मात्र हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी देशाची सुरक्षाच धोक्यात आणत आहेत, असा थेट आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी केला आहे.

देशभरातील आयुध निर्माण संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने हे प्रस्तावित खाजगीकरण मागे घ्यावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. देशात बहुधा प्रथमच आयुध निर्माणी संस्थांचे कर्मचारी एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. मात्र सरकार दडपशाही करून त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. अंबानी अदानींचे सरकार अशीच सामान्य जनतेमध्ये प्रतिमा असलेले केंद्रातील मोदी सरकार देशातील सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगीकरण आणून सरकारी कंपन्या विकत आहेत.

बीएसएनएल, रेल्वे, एअर इंडीया, पेट्रोलियम यासह इतर महत्वाच्या क्षेत्रातही खाजगीकरणाचे धोरण सरकार आखत आहे. एकीकडे देशाची आर्थिक व्यवस्था खालावत चालली आहे. त्यामुळे बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. अशातच सुरक्षेशी निगडीत असलेल्या आयुध निर्माणी मध्ये सुद्धा खाजगीकरण करून सरकार देशाची सुरक्षाच खाजगी कंपन्यांच्या हातात देत आहेत असा आरोप पटोले यांनी केला. एकीकडे भाजपाचे नेते व समर्थक 'देश सुरक्षीत हातो में' असा प्रचार जोमात करतात. मात्र सुरक्षेशी खेळ करण्याचा हा प्रयत्न भविष्यासाठी घातक ठरणार आहे असेही पटोले म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत खाजगी कंपन्यांकडून घेतलेल्या प्रचंड मदतीची परतफेड करण्यासाठीच मोदी सरकार सर्वत्र खाजगीकरण करत आहे असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nana Patole Criticise on Modi Government