'नानाजी देशमुख' मॉडेलवर संघाचा जोर
'नानाजी देशमुख' मॉडेलवर संघाचा जोर

'नानाजी देशमुख' मॉडेलवर संघाचा जोर

नवी दिल्ली - ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत नानाजी देशमुख यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट भागात विकसित केलेले ग्रामविकासाचे मॉडेल भाजपशासित राज्यांसह देशभरात राबविण्याबाबत संघपरिवाराने मोदी सरकारकडे आग्रह धरला आहे. संघाच्या दीनदयाळ संशोधन संस्थेतर्फे आगामी फेब्रुवारी 2017 मध्ये देशव्यापी ग्रामोदय मेळावा भरविण्यात येणार असून, त्यानंतर आदर्श गाव योजनेतील हेच प्रमुख मॉडेल बनविण्यात येईल, अशी चिन्हे आहेत.

संघप्रणित दीनदयाळ संस्थेच्या वतीने फेब्रुवारीत चित्रकूट येथे चार दिवसांचा ग्रामोदय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यात केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र तोमर यांच्यासह भाजपशासित सर्व राज्यांच्या ग्रामविकासमंत्र्यांचा सहभाग असेल. संघप्रमुख मोहन भागवत, सरकार्यवाह भैयाजी जोशी, मदनदास देवी आदी संघनेत्यांचा यात सक्रिय सहभाग अपेक्षित असेल, असे सूत्रांनी सांगितले. यातच गरीबकल्याण योजनेचाही प्रचार प्रसार व आदर्श गाव योजनेशी त्याची सांगड घालण्याबाबत मंथन-चिंतन केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

खासदार आदर्श गाव योजनेत विशेषतः भाजपच्या खासदारांना पंतप्रधानांनी दट्ट्या लावल्याने गावे दत्तक घेतली. मात्र बहुतांश खासदारांच्या बाबतीत हे "दत्तक विधान' कागदावरच राहिले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार यांचा हस्तक्षेप व अधिकाऱ्यांचा आडमुठेपणा याच्या असंख्य तक्रारी पंतप्रधान कार्यालयाकडे आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी पहिल्या टप्प्यात दत्तक घेतलेल्या वाराणसी जिल्ह्यातील जयापूर गावातही सारे काही आलबेल असल्याचे वृत्तांत नाहीत. खासदारांना एखादे गाव विकसित करायचे असेल तर भाजपशासित राज्यातही प्रचंड अडचणी येतात. या समस्यांवर मात करण्यासाठी संघपरिवाराने आपले चाणक्‍य कामाला लावले होते. सूत्रांच्या माहितीनुसार आदर्श गाव योजनेचे मोठ्या प्रमाणावरील अपयश पुसून टाकण्यासाठी प्रदीर्घ विचारमंथनातून असे लक्षात आले की ग्रामविकासाचे नवे मॉडेलच तयार करायला हवे.

चित्रकूट मॉडेलला कलामांची दाद
नानाजी देशमुख यांनी जे चित्रकूट मॉडेल तयार केले होते, त्याला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या जाणत्यानीही दाद दिली होती. या पार्श्‍वभूमीवर संबंधित गावाला स्वयंपूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने एखादा खासदार काय काय प्रयत्न करू शकतो, याची माहिती घेण्यात आली. शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी चित्रकूट परिसरातच दत्तक घेतलेल्या गावासह आणखी काही यशस्वी आदर्श ग्रामविकासाची उदाहरणेही संबंधितांनी अभ्यासली. त्यानंतर नानाजी देशमुख यांचेच मॉडेल धडाक्‍याने राबविण्याच्या विचाराप्रत संघपरिवार आल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com