नारायण साई बलात्कार प्रकरणात दोषी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

स्वत:ला कृष्णाचा अवतार असल्याचे सांगणाऱ्या नारायण साईच्या अटकेनंतर, कृष्णाप्रमाणे महिलांमध्ये बासरी वाजवण्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते.

सुरत (गुजरात) : गुजरातमधील आश्रमात महिला साधकावर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला सुरतमधील न्यायालयाने आज (शुक्रवार) दोषी ठरवले. नारायण साईच्या शिक्षेबाबत न्यायालय 30 एप्रिल रोजी निर्णय देणार आहे.

सुरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी नारायण साई आणि आसाराम बापू याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. सुरतमधील जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. पीडित महिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. हे प्रकरण सुमारे 11 वर्षे जुने होते. या प्रकरणात कोर्टात 53 जणांनी साक्ष दिली. नारायण साई याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. तब्बल दोन महिन्यांनी पोलिसांनी नारायण साईला अटक केली होती. न्यायालयाने आज या प्रकरणात निकाल देताना नारायण साईला दोषी ठरवले आहे.

दरम्यान, नारायण साईने सुरतमधील जहांगीरपुरा आश्रमातील साधिकेवर बलात्कार केला होता आणि त्यानंतर 2004 पर्यंत सातत्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. यानंतर 6 ऑक्टोबर 2013 रोजी पीडितेने नारायण साई, गंगा, जमुना, हनुमान आणि इतर सात जणांवर सुरतमध्ये गुन्हा दाखल केला होता. नारायण साईवर बलात्काराचा गुन्हा दाखल होता, तो भूमिगत झाला. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो सातत्याने आपले ठिकाण बदलत होता. सुरतचे तत्कालीन पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी नारायण साई यांना अटक करण्यासाठी 58 विविध पथके बनवून शोध सुरु केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यानंतर 4 डिसेंबर, 2013 मध्ये नारायण साईला हरियाणा-दिल्ली सीमाजवळ अटक करण्यात आली.

स्वत:ला कृष्णाचा अवतार असल्याचे सांगणाऱ्या नारायण साईच्या अटकेनंतर, कृष्णाप्रमाणे महिलांमध्ये बासरी वाजवण्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. कारागृहामध्ये असताना पोलिस कर्मचाऱ्याला 13 कोटी रुपयांची लाच देण्याचा आरोपही नारायण साईवर लागला होता, पण या प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Sai found guilty in a rape case by Surat Sessions Court