मोदी, अमित शहा दहशतवादी - मंत्री चौधरी

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

मोदी आणि शहा आपल्या लोकशाहीत दहशत पसरवित आहेत. भाजपला उत्तर प्रदेशात बिहारपेक्षा मोठा पराभव स्वीकारावा लागणार आहे. 

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दहशतवादी असून, ते उत्तर प्रदेशातील नागरिकांमध्ये दहशत पसरवत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशातील मंत्री राजेंद्र चौधरी यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशात रविवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. सात टप्प्यात उत्तर प्रदेशात मतदान होत असून, समाजवादी पक्ष (सप) आणि भाजपमध्ये प्रमुख लढत असल्याचे चित्र आहे. पंतप्रधान मोदींकडून समाजवादी पक्षावर टीका करताना धर्माच्या नावावर मतभेद पसरविण्यात येत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना चौधरी यांनी थेट मोदींना दहशतवादीच म्हटले आहे.

चौधरी म्हणाले, की उत्तर प्रदेशात सध्या गुजरातमधील दोन जादूगार जोरदार प्रचार करत आहेत. त्यांना वाटतेय की उत्तर प्रदेशातील नागरिक त्यांचे राजकारण समजत नाहीत. तसेच त्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील मतदार राजकारणाच्या मर्यादेविरोधात काम करणाऱ्यांना पसंती देत नाही. नागरिकांची दिशाभूल करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे या जादूगारांनी जगण्यासाठी दुसरा धंदा शोधला पाहिजे. मोदी आणि शहा आपल्या लोकशाहीत दहशत पसरवित आहेत. भाजपला उत्तर प्रदेशात बिहारपेक्षा मोठा पराभव स्वीकारावा लागणार आहे. 

भाजपने या आरोपांना उत्तर देताना म्हटले आहे, की समाजवादी पक्षाचे नेते निराशेच्या भरात अशी विधाने करत आहेत. त्यांनी पंतप्रधानांबद्दल असे वक्तव्य केल्याने माफी मागावी. पंतप्रधानांविषयी अशी भाषा अशोभणीय आहे.

Web Title: Narendra Modi, Amit Shah are terrorists spreading fear: Uttar Pradesh minister