मतांच्या पिकांसाठी मोदींचे मागणे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

नवी दिल्ली : कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला देणे, हेच महत्त्वाचे मानणाऱ्या मराठी संस्कृतीत "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,' या वाक्‌प्रचाराला आगळे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आज मराठी भागातील बूथप्रमुखांशी संवाद साधताना तिळगूळ घ्या म्हणण्याऐवजी चक्क "तिळगूळ द्या,' असे उलटे संबोधन करून 2019 च्या रणधुमाळीत मतांच्या भरघोस पिकासाठी जणू कार्यकर्त्यांकडूनच मागणे मागितले. 

नवी दिल्ली : कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसऱ्याला देणे, हेच महत्त्वाचे मानणाऱ्या मराठी संस्कृतीत "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,' या वाक्‌प्रचाराला आगळे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आज मराठी भागातील बूथप्रमुखांशी संवाद साधताना तिळगूळ घ्या म्हणण्याऐवजी चक्क "तिळगूळ द्या,' असे उलटे संबोधन करून 2019 च्या रणधुमाळीत मतांच्या भरघोस पिकासाठी जणू कार्यकर्त्यांकडूनच मागणे मागितले. 

कोल्हापूरसह पाच लोकसभा मतदारसंघांतील बूथप्रमुखांशी नमो ऍपद्वारे दिल्लीतून संवाद साधताना मोदींनी, विरोधी पक्षांची आघाडी ही महास्वार्थी असून, आगामी पराभवाचे खापर फोडण्यासाठी आतापासूनच हे मतदानयंत्रांचा बहाणा शोधू लागलेत, असा जोरदार हल्ला चढविला. दुष्काळ निवारणासाठी राज्याला केंद्र पूर्ण मदतीचा हात देईल, असेही मोदींनी सांगितले. 

नमो ऍपद्वारे पाच-सात मतदारसंघांतील बूथप्रमुखांशी बोलण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मोदींनी बोला डॉक्‍टरसाहेब... अशा शब्दांनी किंवा एक-दोन मराठी वाक्‍यांत बूथप्रमुखांची दाद मिळविल्याचे हा कार्यक्रम पाहून जाणवले. दक्षिण गोव्यासह कोल्हापूर, हातकणंगले, माढा व सातारा या मतदारसंघांतील हजारो बूथप्रमुखांशी त्यांनी आज हितगूज केले. हातकणंगले, सातारा येथील उत्तम आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. कधी सुतार आडनावावरून विख्यात शिल्पकार राम सुतार यांची, तर कधी आपल्याला घडविणारे संघनेते लक्ष्मणराव इनामदार ऊर्फ वकीलसाहेब हे साताऱ्याचेच असल्याची आठवण त्यांनी जागविली. 

सुरवातीला मोदींनी मराठीतून सांगितले, "सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, तिळगूळ "द्या' गोड गोड बोला. साधारण 10 दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये मला अनेक विकासकामांचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. कालच मुंबईमध्ये भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्‌घाटन केले. मराठी बंधुभगिनींना भेटून मला नेहमीच आनंद होतो.'' हातकणंगलेचे नामदेव सुतार, कोल्हापूरचे डॉ. सदानंद राजवर्धन, माढ्याचे सदानंद गुलाबराव ढेंगील, साताऱ्याच्या आरती देवरे व गोव्याच्या शैला पारसेकर यांना पंतप्रधानांना प्रश्‍न विचारण्याची संधी मिळाली. 

डॉ. राजवर्धन यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना मोदींनी विरोधकांवर घणाघाती प्रहार केले. ते म्हणाले, ""निवडणूक आघाडी तर आम्हीही केली व त्यांनीही केली आहे. पण विरोधकांची कालची आघाडी ही राजकीय पक्षांची होती व आमची (भाजप) आघाडी ही सव्वाशे कोटी भारतीयांशी आहे. धनशक्ती व जनशक्ती यातील हा फरक आहे. कोलकत्यात लोकशाही वाचविण्याचा आक्रोश करणाऱ्या व्यासपीठावरूनच एकाने चक्क बोफोर्स गैरव्यवहाराचीच आठवण काढली ! अखेर सत्य कधी ना कधी ओठांवर येतेच. तेथे एकत्र आलेले सारे कोण होते ? कोणी स्वतःच्या मुलाबाळांना "सेट' करण्यासाठी, तर कोणी स्वतःलाच "सेट' करण्यासाठी तेथे जमले होते. एकाही घटनात्मक संस्थेवर विश्‍वास नसणारे हे लोक जनतेला मूर्ख समजतात व रंग बदलतात. कोलकत्यातील आघाडी ही नामदारांचे, घराणेशाहीचे, गैरव्यवहारांचे व भ्रष्टाचाराचे, नकारात्मक विचारांचे, अस्थिरता व असमानतेचे असे बंधन होते.'' 

ठेंगील यांच्या प्रश्‍नाच्या उत्तरात मोदी म्हणाले, ""सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक संसदेत 48 तासांत मंजूर झाले. न्यायालयात टिकणारी घटनादुरुस्ती केल्याशिवाय असे आरक्षण देणे शक्‍यच नव्हते. निवडणुका आमच्याकडे बारा महिने चालतात. तेव्हा कधीही हे विधेयक आणले असते, तरी निवडणुकांवर डोळा ठेवल्याचा आरोप झालाच असता. यातील 8 लाख वार्षिक उत्पन्नाची अट ही संपूर्ण लाभार्थी कुटुंबासाठी आहे. ओबीसी क्रिमिलेयरसाठी 8 लाखांचीच मर्यादा असल्याने यातही 8 लाखच मर्यादा ठेवण्यात आली. शिक्षणसंस्थांत 10 टक्के आरक्षण देण्यासाठी जागांचा कोटा वाढविण्यात येईल.'' 

मराठी गीत पाठवा 
अशा व्हिडिओ संवादात पक्ष कार्यकर्तेच मुख्यतः असावेत, भाजप लोकप्रतिनिधींनी त्यात चेहरे झळकावू नयेत, असा अलिखित दंडक असतो. आजच्या कार्यक्रमात मात्र काही मंत्री, आमदारही बसल्याचे दिसले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या "ऍक्‍शन मोड'मध्ये आलेल्या मोदींनी शंकर महादेवन यांनी गायलेले नवे "ब्रेथलेस' गीत उपस्थितांना ऐकविले. यांसारखेच पण लावणी किंवा भजनाच्या स्वरूपात एक गीत मराठीतून करून आठवडाभरात नमो ऍपवर पाठवा. मी ते ट्विटरवर शेअर करेन, असेही मोदींनी सांगितले.

Web Title: Narendra Modi appeals to voting for BJP