बंगालमध्ये "टोळी'राज्य : मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

"पश्‍चिम बंगाल सरकार शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आवश्‍यक पावले उचलेल, अशी मला आशा आहे. देशातील, राज्यातील शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्राचा प्रयोग करावा, अशी आमची अपेक्षा आहे.'' - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मिदनापूर: पश्‍चिम बंगालची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. बंगालमध्ये सध्या "टोळी' राज्य असून, ही टोळी बंगालची संस्कृती नष्ट करत आहे. "मां, माटी, माणूस याची भाषा करणाऱ्यांचा खरा चेहरा गेल्या आठ वर्षांत समोर आला आहे, अशी टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर केली. मिदनापूर येथील सभेत बोलताना मोदी यांनी बंगालमध्ये "टोळी' राज्य करत असल्याचा घणाघाती आरोप केला. ही टोळी राज्यात खंडणी वसूल करत आहे, शेतकऱ्यांचे लाभ हिरावून घेत आहे. एवढेच नाही तर ही टोळी विरोधकांची हत्या घडवून आणत आहे. गरिबांवरील अत्याचार वाढले असून, सत्तेवर राहण्यासाठी सर्वप्रकारचे बेकायदा तंत्र अवलंबत असल्याचा आरोप मोदींनी केला. 

पंतप्रधान यांनी आपल्या भाषणातून कॉंग्रेस आणि पश्‍चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) योग्य भाव देण्याची मागणी शेतकरी करत होते आणि त्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलनही करत होते. मात्र, दिल्लीत असलेल्या तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांचे काहीही ऐकले नाही. मात्र, भाजपचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दीडपट एमएसपी देण्याचा निर्णय घेतला आहे. माझे सरकार हे आपले सरकार आहे. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे हित साधणारे सरकार आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत असल्याचे प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित सभेत केले. शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेचे बियाणे उपलब्ध करून देण्यापासून ते विक्रीची संधी देण्यासाठी सरकार काम करत आहे. धान्य सुरक्षित राहण्यासाठी गोदामाची सुविधा वाढवण्याची गरज असल्याचेही मोदी म्हणाले. या वेळी मोदी यांनी पंचायत निवडणुकीतील हिंसाचार आणि दबावतंत्राचे वातावरण असतानाही भाजपला कौल दिल्याबद्दल बंगालच्या जनतेचे आभार मानले. 

आज पश्‍चिम बंगालमध्ये सर्वसामान्यांचे जीवन असुरक्षित बनले आहे. "पूजा' करणेदेखील कठीण झाले आहे. महान बंगालची महान परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंगालमध्ये नवीन कंपनी सुरू करायची असो किंवा रुग्णालय सुरू करायचे असो, "टोळी'ला काहीतरी दिल्याशिवाय काम सुरू होत नाही. बंगालमध्ये सर्वकाही "टोळी'च्या मर्जीप्रमाणे होते. चिटफंड ते आलूबॉंपर्यंत सर्वकाही सिंडीकेटच्या (टोळी) मर्जीनुसार चालत आहे, असे मोदी म्हणाले. सभेच्या ठिकाणी ममता बॅनर्जी यांच्या होर्डिंग्जवरही मोदी यांनी टीका केली. ते म्हणाले, मी ममतादीदी यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्या स्वागतासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात झेंडे लावले आणि स्वत: हात जोडून पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी स्वत:चेही होर्डिंग्ज लावले आहेत. 

"पश्‍चिम बंगाल सरकार शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आवश्‍यक पावले उचलेल, अशी मला आशा आहे. देशातील, राज्यातील शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्राचा प्रयोग करावा, अशी आमची अपेक्षा आहे.'' 
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: narendra modi criticise on mamata banerjee in west bengal