मोदींच्या शाब्दिक हल्ल्यानंतर काँग्रेसचा सभात्याग

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी यावेळी पंतप्रधानांची पाठराखण करताना "याच सभागृहामध्ये पंतप्रधानांना हिटलर म्हटले गेले,' असे सांगितले.

नवी दिल्ली : काळा पैसा आणि नोटाबंदीच्या मुद्यावरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) दिलेल्या प्रत्युत्तरामुळे कॉंग्रेसच्या खासदारांनी राज्यसभेत संताप व्यक्त केला. डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरील टिप्पणीमुळे संतापलेल्या कॉंग्रेसने सभात्याग केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

राज्यसभेमध्ये डॉ. मनमोहनसिंग यांनी नोटाबंदीचा निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीवर घणाघाती टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी आज या टीकेला प्रत्युत्तर दिले. 'मनमोहनसिंग यांचे सरकार सत्तेत असताना अनेक गैरव्यवहार झाले, भरपूर भ्रष्टाचार झाला; पण त्यांच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम झाला नाही.

बाथरूममध्ये रेनकोट घालून कसे जायचे, हे मनमोहनसिंग यांनी चांगलेच ठाऊक आहे,' अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी केली. यावर कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत गदारोळ घातला. यामुळे काही वेळ पंतप्रधान मोदी यांचे भाषण थांबले. मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध करत कॉंग्रेसने सभात्याग केला.

ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी यावेळी पंतप्रधानांची पाठराखण करताना "याच सभागृहामध्ये पंतप्रधानांना हिटलर म्हटले गेले,' असे सांगितले.

    Web Title: Narendra Modi criticize Dr. Manmohan SIngh on demonetization