आपण जगालाही प्रेरित करू शकतो : मोदी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 मे 2020

आर्थिक क्षेत्रातही आपण नवे उदाहरण स्थापित करू, आपल्या सामर्थ्याने आर्थिक क्षेत्रातही जगाला चकितच नव्हे तर प्रेरितही करू शकतो, असा दुर्दम्य विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली - संपूर्ण जगाला हादरे देणाऱ्या कोरोना महामारी विरोधातल्या लढ्यात १३० कोटी भारतीयांनी आपल्या एकजुटीने जगाला अचंबित केले. त्याचप्रमाणे आपण आर्थिक क्षेत्रातही आपण नवे उदाहरण स्थापित करू, आपल्या सामर्थ्याने आर्थिक क्षेत्रातही जगाला चकितच नव्हे तर प्रेरितही करू शकतो, असा दुर्दम्य विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सलग दुसऱ्या वेळेस स्पष्ट आणि घवघवीत बहुमताने विजयी झालेल्या मोदी-२ सरकारला आज ( ता. ३०) एक वर्ष पूर्ण होत आहे. दिवसेंदिवस भारताभोवताली आपला विळखा घट्ट करणाऱ्या कोरोना महामारीबरोबर देश झगडत असताना पंतप्रधानांनी आज संध्याकाळी देशवासीयांना पत्र लिहून वर्षपूर्तीनिमित्त आपल्या भावना शब्दबद्ध केल्या. अखेरीस त्यांनी स्वतःला प्रधानसेवक असे संबोधित केले आहे. दोन महिन्यांहून अधिक काळाच्या कोरोना लॉकडाउनमुळे गरीब कष्टकरी, फुटपाथपर वस्तू विकणारे, मजुरी करणारे यासह देशवासीयांना अनेक यातना सोसाव्या लागल्या आहेत, याची कबुली मोदींनी दिली आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीच्या सर्जिकल स्ट्राइक आणि पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसून भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांचा उल्लेख या संदेशात आहे. त्याचबरोबर जनधन, उज्वला, किसान सन्मान, असंघटित मजुरांच्या बँक खात्यांवर थेट पैसे जमा होणे, मोफत गॅस जोडणी, मोफत वीज जोडणी, शौचालये, शहरी व ग्रामीण गरिबांसाठी लाखो घरे,यासारख्या अनेक योजना/ मुद्द्यांचा उल्लेख या पत्रात आहे. आपल्या संदेशाच्या अखेरीस त्यांनी आरोग्यसंपन्न राहा,सुरक्षित राहा,जागृत राहा, जागरूकता ठेवा, असेही आवाहन देशवासीयांना केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या एका वर्षात सरकारने घेतलेल्या कलम ३७० आणि कलम ३५ रद्द करणे, तोंडी तलाकबंदी, नागरिकत्व सुधारणा कायदा , निवृत्त लष्करी जवानांसाठीचे एक पद एक निवृत्तीवेतन, जीएसटी, शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या किमान हमी भावाच्या मागणीची पूर्तता, सरसेनाध्यक्ष हे पद निर्माण करणे आदी मुद्द्यांना या पत्रात पंतप्रधानांनी स्पर्श केला आहे. त्याबरोबरच अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाचा आणि त्यानंतर देशात कायम राहिलेल्या सामाजिक सद्भावनेचाही सूचक उल्लेख त्यांनी केला आहे. 

मोदी म्हणाले... 
- संभाव्य आर्थिक संकटात स्व-सामर्थ्यावर उभे राहावेच लागेल 
- आयातीवरील अवलंबित्व कमी करत जाणे अपरिहार्य 
- आत्मनिर्भर भारत हाच एकमेव मार्ग 
- ‘आत्मनिर्भर भारतात प्रत्येक देशवासियासाठी नव्या संधी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi expressed confidence that inspire the world in the economic field