"कुठे औषधं नाहीत, कुणाला बँडेज नाही.....अरेच्चा, हे तर मुन्नाभाईचं हॉस्पिटल"

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 जुलै 2020

मोदींनी गलवान संघर्षात जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. मात्र, त्यांच्या या रुग्णालय भेटीवरुन ट्रोलिंग सुरु झालं आहे. नेटकऱ्यांनी मोदींच्या या रुग्णालय भेटीची तुलना मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाशी करत #munnabhaiMBBS हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. 

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जून रोजी अनपेक्षितपणे लेहला भेट दिली होती. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.  मोदींनी लेहमधील निमू या लष्करी ठाण्याला भेट देत जवानांशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी गलवान संघर्षात जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. मात्र, त्यांच्या या रुग्णालय भेटीवरुन ट्रोलिंग सुरु झालं आहे. नेटकऱ्यांनी मोदींच्या या रुग्णालय भेटीची तुलना मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाशी करत #munnabhaiMBBS हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. 

 

मोदींनी जखमी जवानांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी जवान असलेल्या खोलीमध्ये कुठेही रुग्णालयासारखं वातावरण दिसत नाही. जवानांना कुठेही बँडेज नाही, कुठे ऑक्सिजन सिलेंडर नाही किंवा कुठे औषधेही दिसत नाहीत. शिवाय जवानांच्या आजूबाजूला कुठे डॉक्टर किंवा नर्सही दिसत नाहीत. छायाचित्रकार मात्र दिसतात. हा मुद्दा पकडत नेटकऱ्यांनी हे तर मुन्नाभाईचं हॉस्पिटल असं म्हणत नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे.  

काँग्रेस नेते आणि काही टीकाकारांनीही मोदींच्या रुग्णालय भेटीवरुन ट्रोलिंग केलं आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव साटव यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे छायाचित्र शेअर करत मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींना हे छायाचित्र दाखवा म्हणजे त्यांना कळेल जवानांना कसे भेटतात? असं कॅप्शन त्यांनी ट्विटला दिलं आहे. जवानांना एका कॉन्फरन्स हॉलमध्ये ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. यावरुनही मोदींना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. मोदी येणार म्हणून कॉन्फरन्स हॉलला रुग्णालयात बदलण्यात आलं. प्रसिद्धसाठी काहीही केलं जाऊ शकतं, असा टोला नेटकऱ्यांनी मारला आहे.

दरम्यान, मोदींच्या रुग्णालय भेटीवरुन नेटकऱ्यांनी राळ उठवल्याने लष्कराकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एका सामान्य हॉलचं रुग्णालयात रुपांतर करण्यात आलं आहे. जखमी झालेल्या जवानांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, काहींनी जी टिका-टिप्पणी सुरु केली आहे ती खेदजनक आहे, असं लष्कराने म्हटलं आहे. लष्कराकडून याबाबत ट्विट करुन स्पष्टिकरण देण्यात आलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी लेहमध्ये जवानांना संबोधित केले होते. भारतीय जवानांचे बाहू पर्वतासारखे मजबूत आहेत. जवानांचे शौर्य आणि साहस,  माँ भारतीच्या सुरक्षेसाठीचे त्यांचे समर्पन अतुलनीय आहे. ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही इतक्या उंचीवर देशाच्या सुरक्षेसाठी ढाल बनून उभे आहात, त्याची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही. तुमचा निश्चय या पर्यतांच्या कठोरतेपेक्षाही अधिक आहे. देशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे. त्यामुळे मी आणि सर्व भारतवासी निश्चिंत आहोत. तुम्ही जे शौर्य दाखवले आहे, त्यामुळे संपूर्ण जगाला आपली ताकद काय आहे याची प्रचिती आली आहे असं म्हणत मोदींनी जवानांचे मनोबल वाढवले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narendra modi get troll over leh hospital visit