मोदींनी पूर्णपणे विश्वासार्हता गमाविली - केजरीवाल

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

मोदीजी आता काँग्रेसमुक्त भारतासाठी नाही, तर भाजपमुक्त भारतासाठी काम करत आहेत. नागरिक आता भाजपचा द्वेष करू लागले आहेत. त्यामुळे पुढील 20 वर्षेतरी नागरिक भाजपला मतदान करणार नाहीत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला धोका दिला असून, काळ्या पैशातील एक रुपयाही ते बाहेर काढू शकले नाहीत. मोदींनी आपली विश्वासार्हता पूर्णपणे गमाविली, अशी जोरदार टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींनी शनिवारी रात्री देशवासियांना संबोधित भाषण केले. या भाषणात त्यांनी काळ्या पैशाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. मोदींनी शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, गर्भवती महिला, छोटे व्यापारी, गरीब अशा सर्व वर्गातील नागरिकांसाठी सवलतींची घोषणा केली. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांनी भाषणानंतर मोदींवर टीकास्त्र सोडले.

केजरीवाल म्हणाले, की भ्रष्टाचाराच्या प्रमाणात कोणतीही घट झालेली दिसून येत नाही. काळ्या पैशातील एक रुपयाही बाहेर आला नाही. मोदींनी दिलेली आश्वासने किती पोकळ होती, हे दिसून येत आहे. नागरिकांनीही त्यांच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवणे बंद केले आहे. काळा पैसा किती बाहेर आला, हे ऐकण्यासाठी देशातील नागरिक उत्सुक होते. पण, तसे काही झालेच नाही. मोदीजी आता काँग्रेसमुक्त भारतासाठी नाही, तर भाजपमुक्त भारतासाठी काम करत आहेत. नागरिक आता भाजपचा द्वेष करू लागले आहेत. त्यामुळे पुढील 20 वर्षेतरी नागरिक भाजपला मतदान करणार नाहीत.

Web Title: Narendra Modi has lost all credibility: Arvind Kejriwal after PM's speech