नोव्हेंबरमध्ये लोकसभा निवडणूक होणार; कामाला लागा: काँग्रेस 

Ghulam-Sonia-Kharge
Ghulam-Sonia-Kharge

लखनौ - येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक होण्याची 90% शक्‍यता असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केले आहे."पक्ष कार्यकर्ते म्हणून तुम्ही अनेक वर्षे पक्षाची झटून सेवा केली आहे. आता पुढील निवडणूक जिंकण्याचे आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याच्या उद्देशार्थ तुम्ही लक्ष केंद्रित करावयास हवे,'' असे काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रभारी असलेल्या आझाद यांनी सांगितले.

''अध्यक्षीय निवडणुकी''ची भीती 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनास संबोधित करताना लोकसभा व राज्य निवडणुका एकत्र घेण्याचे आवाहन केले होते. यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुकांबरोबरच लोकसभा निवडणूकही होण्याची दाट शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना "एक देश, एक निवडणूक' या संकल्पनेचा विचार करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर, सर्वच पक्षांमध्ये मुदतपूर्व निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचे मानले जात आहे.

मुदतपूर्व व "राज्य व केंद्र' अशा एकत्र निवडणुका झाल्यास भारतीय जनता पक्षास (भाजप) त्याचा फायदा होईल, अशी विरोधकांना भीती आहे. याच आठवड्यात भाजपला राजस्थानमधील दोन लोकसभा व एका विधानसभेच्या जागेवर कॉंग्रेसकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र अध्यक्षीय निवडणुकीप्रमाणे संपूर्ण देशातच एकदम निवडणूक घेतल्यास राजस्थान, मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यांमधील भाजपविरोधी जनमताचा प्रभाव कमी होऊन केंद्रात मोदींसाठी व पर्यायाने राज्यात भाजपसाठीच मतदान होण्याची भीती या पार्श्‍वभूमीवर व्यक्त करण्यात आली आहे.

चंद्राबाबु नायडू व उद्धव ठाकरेंमध्ये झाली चर्चा
दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येही सर्व आलबेल नसल्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रामधील मुख्य पक्ष असलेला शिवसेना आणि भाजपमध्ये राज्यात सत्ता स्थापन झाल्यापासून सातत्याने संघर्ष होताना दिसत आहेच. एनडीएमधील असंतुष्टांमध्ये आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडु यांची भर पडल्याचे मानले जात आहे. नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये आंध्र प्रदेशला विशेष फायदा मिळाला नसल्याने तेलगु देसम पक्षाकडून (टीडीपी) नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर नायडू व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात 'चर्चा' झाल्याचा दावा सेनेकडून करण्यात आला आहे. भाजपबरोबरील संबंध तोडून येत्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर उतरावे, असा पक्षामधील मुख्य सूर असल्याचे नायडू यांनी ठाकरे यांना सांगितल्याची माहिती सेनेकडून देण्यात आली आहे. ठाकरे हे तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संपर्कातही आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, लोकसभा निवडणूक मुदतपूर्व झाली तरीही भाजपपुढील आव्हाने कमी जटिल नसतील, असे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आता काय भूमिका व्यक्त करण्यात येते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com