मोदी सरकारविरोधात अविश्‍वासदर्शक ठराव आजही नाही

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

अविश्‍वासदर्शक ठरावासाठी सभागृहातील किमान 50 खासदारांचा पाठिंबा असण्याची अट आहे. सध्या लोकसभेतील एकूण 539 जागांपैकी (सभापती वगळता) भाजपकडे सध्या किमान 272 जागांचे बळ आहे. याशिवाय भाजपला काही मित्रपक्षांचाही पाठिंबा आहे

नवी दिल्ली - संसदेत झालेल्या गदारोळामुळे सभापती सुमित्रा महाजन यांनी आज (सोमवार) लोकसभेचे कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला. यामुळे विरोधकांना केंद्र सरकारविरोधात अविश्‍वासदर्शक ठराव मांडण्यात आजही अपयश आले. गेल्या शुक्रवारीही विरोधकांनी सरकारविरोधात अविश्‍वासदर्शक ठराव मांडण्याचा प्रयत्न केला होता.

सरकारविरोधात अविश्‍वासदर्शक ठराव मांडण्यामध्ये आंध्र प्रदेशमधील वायएसआर कॉंग्रेस आणि तेलगु देसम पक्ष (टीडीपी) या राजकीय पक्षांची भूमिका आहे. हे दोन्ही पक्ष केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने नाराज आहेत.

अविश्‍वासदर्शक ठरावासाठी सभागृहातील किमान 50 खासदारांचा पाठिंबा असण्याची अट आहे. सध्या लोकसभेतील एकूण 539 जागांपैकी (सभापती वगळता) भाजपकडे सध्या किमान 272 जागांचे बळ आहे. याशिवाय भाजपला काही मित्रपक्षांचाही पाठिंबा आहे. यामुळे अविश्‍वासदर्शक ठराव मांडण्यात आल्यास सरकारला त्यामधून धोका निर्माण होणार नाही, असा अंदाज आहे. या अविश्‍वासदर्शक ठरावास कॉंग्रेस व डाव्या पक्षांनीही पाठिंबा व्यक्त केला आहे.

आज संसदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारची अविश्‍वासदर्शक ठरावावरील चर्चेस सामोरे जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. मात्र संसदेमधील वातावरण सुरळित झाल्याशिवाय मी यावर चर्चा घेऊ शकत नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

Web Title: narendra modi losabha no confidence motion india