दिशाभूल करण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 मे 2017

कॉंग्रेसची पंतप्रधानांवर टीका; स्पष्टीकरण देण्याची मागणी
 

नवी दिल्ली : आपला तिसरा वाढदिवस उद्या जल्लोषात साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या मोदी सरकारवर कॉंग्रेसने आज जोरदार हल्ला चढवला. देशात युद्धाचा उन्माद पसरविला जात असून, तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेची दिशाभूल करण्यासाठी हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी होणार आहे. मात्र, ही वेळ जल्लोष करण्याची नव्हे तर मोदींनी उत्तर देण्याची आहे, अशी तोफ कॉंग्रेसने डागली.

सरकारला घेरण्यात कॉंग्रेसला अद्याप यश आलेले नाही, असे असताना तीन वर्षपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि सत्ताधारी भाजपवर आक्रमण करण्याची रणनीती आखली असून, याअंतर्गत 16 मे रोजी कॉंग्रेसच्या तरुण नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन "तीन साल 30 तिकडम्‌' ही चित्रफीत प्रसिद्ध केली होती. आज पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी सरकावर खरमरीत टीका केली. या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारचे दीड हजार कोटी रुपये, सरकारी कंपन्या आणि भाजपशासित राज्य सरकारांचे शेकडो कोटी रुपये जाहिरातबाजीच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्यासाठी उधळले जाणार आहेत.

अंतर्गत सुरक्षा आणि सीमेवरील सुरक्षेबाबतचे मोदी सरकारचे धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आतापर्यंत 538 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. आता हल्ल्याच्या चित्रफिती दाखवून पाकिस्तानविरुद्ध युद्धाचा उन्माद पसरविला जात आहे. सरकारच्या अपयशाबद्दल प्रश्‍न उपस्थित केले जाऊ नयेत यासाठीच हा प्रकार सुरू आहे. बेजबाबदार निर्णय घेण्याऐवजी पंतप्रधानांनी देशाला विश्‍वासात घ्यावे. पाकिस्तानबद्दलचे पंतप्रधानांचे धोरण पूर्णतः अपयशी झाले असून याबद्दल देशाची माफी मागावी, अशीही मागणी आनंद शर्मा यांनी केली.

किती जणांना नोकऱ्या दिल्या?
आर्थिक आघाडीवर देशाची पीछेहाट झाल्याचा दावा करताना आनंद शर्मा म्हणाले, की वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे दावे करणाऱ्या मोदींनी आतापर्यंत किती जणांना नोकऱ्या दिल्या त्यांची यादी प्रसिद्ध करावी. आर्थिक विकासदराचे (जीडीपी) गुलाबी चित्र रंगविले जात आहे; परंतु जीडीपी मापनाचे मापदंड बदलून आकडेवारी दाखविली जात आहे. आता विकासदर 6.6 टक्के असला तरी जुन्या निकषांनुसार तो प्रत्यक्षात 2 टक्‍क्‍यांनी कमी आहे. जुन्या आणि नव्या निकषांनुसार गेल्या दहा वर्षांतील विकासदराचे आकडे सरकारने जाहीर करावेत. त्यातून वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असेही आव्हान कॉंग्रेस प्रवक्‍त्याने दिले.

Web Title: narendra modi loss of crores congress critics bjp third year of modi govt