मोदींनी घेतले मुक्तिनाथ, पशुपतिनाथांचे दर्शन 

पीटीआय
रविवार, 13 मे 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नेपाळच्या प्रसिद्ध मुक्तिनाथ मंदिरात पूजा केली. हिंदू आणि बौद्ध या दोन्हींसाठी हे मंदिर पवित्र मानले जाते. मोदी यांनी बौद्ध परंपरेतील लाल कपड्याचा पेहराव केला होता आणि हिंदू आणि बौद्ध रितीरिवाजाप्रमाणे पूजा केली. 
 

काठमांडू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नेपाळच्या प्रसिद्ध मुक्तिनाथ मंदिरात पूजा केली. हिंदू आणि बौद्ध या दोन्हींसाठी हे मंदिर पवित्र मानले जाते. मोदी यांनी बौद्ध परंपरेतील लाल कपड्याचा पेहराव केला होता आणि हिंदू आणि बौद्ध रितीरिवाजाप्रमाणे पूजा केली. 

नेपाळ-चीन सीमेवरील मुश्‍तांग जिल्ह्यातील मुक्तिनाथ मंदिर येथे आज सकाळी दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. हिमालयाच्या कुशीत असलेल्या मंदिरात मोदी यांनी अर्धा तासाहून अधिक काळ व्यथित केला. मुक्तिनाथ मंदिर हे भारत आणि नेपाळ यांच्यातील सांस्कृतिक संबंधांना जोडणारा मोठा दूवा मानला जातो. या ठिकाणी भगवान विष्णू आणि श्री मुक्तिनारायण यांच्या मूर्ती आहेत. मुक्तिनाथ मंदिराला भेट देण्याच्या पार्श्‍वभूमीवर मुश्‍तांग जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मोदींचा दौरा सुरक्षित आणि नियोजितपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मेहनत घेतली. त्यानंतर त्यांनी पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी स्वागत कक्षातील अभ्यागताच्या नोंदवहीत मंदिराबाबतच्या भावना व्यक्त केल्या. 

प्रचंड, देऊबा यांच्याशी चर्चा

दरम्यान, नेपाळचे माजी पंतप्रधान आणि माओवादी पक्षाचे नेते प्रचंड यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय संबंधाबाबत चर्चा केली. तसेच नेपाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान शेह बहादूर देऊबा आणि नेपाळी कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी ट्‌विटरवर या भेटीची माहिती दिली आहे. तत्पूर्वी शुक्रवारी मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेतली होती. त्यानंतर उभय नेत्यांच्या शिष्टमंडळांची दीर्घ काळ चर्चा झाली. या चर्चेत द्विपक्षीय संबंधाच्या सर्व बाजूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मोदी यांनी नेपाळच्या अध्यक्षा विद्या देवी भंडारी आणि नेपाळचे उपाध्यक्ष नंदबहादूर पून यांचीदेखील भेट घेतली. 
 

Web Title: narendra modi in nepal