
Narendra Modi : पंतप्रधानांनी जाहीर केली देशातील वाघांची नवीन आकडेवारी; भारतात सध्या किती वाघ?
नवी दिल्लीः प्रोजेक्ट टायगरला आज ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल म्हैसूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाघांची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, २०२२च्या अखेरपर्यंत देशामध्ये ३ हजार १६७ वाघ आहेत. १ एप्रिल १९७३ रोजी भारताने वाघ वाचवण्यासाठी मोहीम सुरु केली होती. त्यालाच प्रोजेक्ट टायगर असं नाव देण्यात आलेलं होतं.
'प्रोजेक्ट टायगर'चं यश आज दिसून येत असून जगातील ७० टक्के वाघ एकट्या भारतामध्ये आहेत. दरवर्षी ही लोकसंख्या ६ टक्क्यांनी वाढत आहे. माणसांप्रमाणेच प्रत्येक वाघांचे स्वतःची वेगळी ओळख असते. त्यांचे ठसे वेगवेगळे असतात.
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. ते कर्नाटकला रवाना झाले आहेत. दरम्यान त्यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी-शर्ट आणि काळे शूज, एका हातात जॅकेट घेतलेलं दिसत आहे. या शैलीत आज पीएम मोदींनी सफारीचा आनंद घेतला.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निलगिरी जिल्ह्यात आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. एमटीआर अधिकाऱ्यांनी 7 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत झोनमधील हॉटेल, हत्ती सफारी आणि पर्यटक वाहने तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.