नरेंद्र मोदींना केजरीवालांचा ‘सलाम’

पीटीआय
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये जाऊन लष्कराने केलेल्या लक्ष्यवेधी हल्ल्याद्वारे (सर्जिकल स्ट्राइक) पाकिस्तानला दिलेल्या उत्तराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘सलाम’ केला आहे. तसेच पाकिस्तानला नामोहरम करण्याची योजना भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवावी, असे आवाहन केजरीवाल यांनी केंद्राला केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर विविध मुद्यांवर मतभेद असले तरी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांविरोधात केलेल्या या कारवाईबद्दल मी मोदींना ‘सलाम’ करतो, त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे, असे केजरीवाल यांनी आज म्हटले आहे. मोदी सरकार आणि पाकिस्तानबाबतची भूमिका यांच्यावर नेहमीच टीका करणाऱ्या केजरीवालांनी मोदींचे कौतुक केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे; परंतु माझे त्यांच्याशी १०० मुद्यांवर दुमत असले तरी त्यांनी दाखविलेल्या इच्छाशक्तीला मी सलाम करतो, असे त्यांनी म्हटले. 

लक्ष्यवेधी हल्ल्यानंतर 
मोदींबाबत काहीच न बोललेले केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत बोलताना मात्र केंद्रासोबत उभे राहण्याची हीच वेळ असल्याचे म्हटले होते. आज त्यांनी त्यादृष्टीने पावले टाकत मोदींना सलाम करत असल्याचे म्हटले आहे. 

पाकिस्तान सध्या आंतरराष्ट्रीय पत्रकारांना सीमारेषेची सैर करून लक्ष्यवेधी हल्ले झालेच नसल्याचा बनाव रचत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून, याचा मला संताप होत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

ज्या प्रकारे तुम्ही आणि लष्कराने मिळून पाकिस्तानला धडा शिकवलात, त्याचप्रमाणे त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बदनाम करण्याचा प्रयत्नही हाणून पाडा, अशी माझी पंतप्रधानांना विनंती आहे. कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, अशीही मी विनंती करतो.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narendra modi salute by arvind kejariwal