कोणत्याही विषयावर चर्चेस आम्ही तयार- मोदी

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

देशात जर सर्व पक्ष एकत्र चालले तर सर्व निर्णय वेळेत होतात, सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि आवश्यकतेवर अधिवेशनात चर्चा होईल.

नवी दिल्ली - देशहितासाठी सर्व पक्षांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. नोटबंदीसह कोणत्याही विषयावर चर्चेसाठी आम्ही तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून (बुधवार) सुरु होत आहे. अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सहकार्याचे आवाहन केले. यंदाचे अधिवेशन ‘नोट-ग्रस्त’ राहणार असले तरी, सरकारने मात्र महत्त्वाकांक्षी कार्यक्रमपत्रिका आखलेली आहे. यामध्ये केंद्रीय वस्तू व सेवाकरविषयक विधेयक (२०१६), एकात्मिक वस्तू व सेवाकर विधेयक, या करप्रणालीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईविषयक विधेयक, घटस्फोटाबाबतचे दुरुस्तीविधेयक आदी विधेयकांचा समावेश आहे. ही विधेयके संसदेत सादर करून मंजूर करण्याचा सरकारचा विचार आहे.

पंतप्रधान म्हणाले, की देशात जर सर्व पक्ष एकत्र चालले तर सर्व निर्णय वेळेत होतात, सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि आवश्यकतेवर अधिवेशनात चर्चा होईल. सर्व पक्षांचे चांगले योगदान मिळेल, सर्व पक्षांना एकत्र घेऊन चालण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. जीएसटी विधेयकाला पुढे नेण्यासाठी सर्व राज्यसरकार आणि सर्व पक्ष एकत्र आहेत.

Web Title: narendra modi says government ready to hold discussion on all issues in Winter session of Parliament