'दांडीबहाद्दरां'ना मोदींची तंबी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 मार्च 2017

संसद अधिवेशनाला नियमितपणे उपस्थित राहाणे व कामकाजात भाग घेणे हे खासदार म्हणून आपले कर्तव्यच आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

संसदेत कटाक्षाने उपस्थित राहण्याचा आदेश

नवी दिल्ली: संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत येऊन संसदेलाच दांडी मारणाऱ्या सत्तारूढ भाजपच्या मंत्री व खासदारांच्या वाढत्या संख्येची अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच गंभीर दखल घेतली आहे. आज झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदी यांनी संसदेत कटाक्षाने हजर राहण्याबाबत आपल्या मंत्र्यांसह खासदारांना कडक तंबी दिली. "मी स्वतः कोणत्याही वेळी तुम्ही सभागृहात आहात की नाही हे पाहीन,' अशा शब्दांत मोदींनी इशारा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यसभेत काल नितीन गडकरी यांच्यासह तब्बल तीन मंत्र्यांनी प्रश्‍नोत्तर तासातच दांडी मारल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले आहे.

राज्यसभेतील भाजप बाकांवरील कालचा सदस्य दुष्काळ केवळ प्रश्‍नोत्तर काळापुरताच नव्हता. दुपारी दोनला पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा तर अपुऱ्या सदस्यसंख्येमुळे खासदारांना येण्याबाबत सूचना देणारी घंटा किमान वीस मिनिटे संसद भवनाच्या गल्ल्यांमधून सतत वाजवावी लागल्याचे सांगितले गेले.
संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर सांगितले, की भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या 11 कोटी सदस्यांना थेट जोडून घेण्याचे निर्देश पक्षाने खासदारांना दिले आहेत. यानिमित्त "जीएसटी' विधेयकांसह सरकारच्या क्रांतिकारक निर्णयांची माहिती तळागाळापर्यंत पोचविण्यात खासदारांनी पुढाकार घ्यावा. यानिमित्त दिल्लीपासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमांना भाजपचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, केंद्र व राज्य सरकारे तसेच भाजप नेत्यांनी सहभागी व्हावे. त्यानंतर 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी देशवासीयांना "भीम' ऍपची माहिती दिली जाईल. "न्यू इंडिया' ही यंदाच्या वर्धापन दिन उत्सवाची मध्यवर्ती संकल्पना असेल, असे ते म्हणाले.

राज्यसभाच नव्हे तर सरकारचे बहुमत असलेल्या लोकसभेतही अनेक खासदार जेवणाच्या सुटीनंतर संसदेत येतच नाहीत असे निदर्शनास आले आहे. अनंतकुमार यांनीच आजच्या बैठकीत हा विषय उपस्थित केला. त्यावर मोदींनी वरील तंबी स्वपक्षीयांना दिली. भाजप सूत्रांच्या म्हणण्यानुसार खासदार संसदेत आहेत म्हणजे ते सभागृहात प्रत्यक्ष आहेत काय, हे पाहिले जाईल. लॉबीत किंवा सेंट्रल हॉलमध्ये असल्यास संबंधित खासदार गैरहजर आहे असे मानले जाईल. मोदी यांनी खासदारांना सांगितले, की तुम्ही सभागृहात आहात का व त्या वेळी कोणता विषय चालला आहे, हे मी कधीही "चेक' करू शकतो. मी दिल्लीबाहेर असेन तेव्हा कोणत्याही अधिकाऱ्यामार्फत मी तुम्हाला बोलावू शकतो.

Web Title: Narendra modi taken seriously absent minister