मोदींची सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा; उपायांबाबत विचारमंथन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 एप्रिल 2020

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वच आघाड्यांवर मुकाबला करणाऱ्या केंद्र सरकारने  सर्वपक्षीय बड्या नेत्यांबरोबरवर संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. 

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वच आघाड्यांवर मुकाबला करणाऱ्या केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बड्या नेत्यांबरोबरवर संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान यांच्यासह राष्ट्रीय पक्षांच्या बड्या नेत्यांशी उपाययोजनांसंदर्भात दूरध्वनीद्वारे चर्चा केली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या महामारीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत जात असल्याचे पाहून आता कोरोनाबरोबर लढण्यासाठी राज्यनिहाय वेगवेगळी रणनीती आखण्याचा विचार केंद्रीय पातळीवर सुरू आहे. दरम्यान देशातील कोरोना रुग्णांची संख्या आज ३ हजार ३७६ झाली तर मृतांचा आकडा ७७ वर पोचला आहे. कोरोनाच्या वेढ्यातून सुटलेल्यांची संख्याही २६७ पर्यंत वाढली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांबरोबर कोरोना संकटाच्या संदर्भात चर्चा केली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि एच.डी. देवेगौडा तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, सपा नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव, द्रमुकचे स्टॅलिन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आदी नेत्यांबरोबर मोदींनी चर्चा करून कोरोनासंदर्भातील उपायोजना व या नेत्यांकडून असलेल्या सूचना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

तामिळनाडूला फटका 
गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४७२ ने वाढली आहे. बारा जणांना प्राण गमवावे लागले असून ८३ रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगण, दिल्ली, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये संसर्गाची तीव्रता वाढली आहे. दिल्लीतील तबलीगी जमातच्या कार्यक्रमाची मोठी किंमत तमिळनाडूला मोजावी लागत असून येथील रुग्णांची संख्या भीतीदायक पद्धतीने वाढत चालली आहे. येथे आतापर्यंत सहाजणांना प्राण गमवावे लागले आहेत. 

नेमकी योजना काय? 
केंद्र सरकारतर्फे राज्यनिहाय कोरोना निर्मूलन उपाययोजनेवर भर देण्यात येणार आहे. महाराष्ट्र, केरळ, तेलंगण, तमिळनाडू, दिल्ली सारख्या कोरोनाचे सर्वाधिक संकट असलेल्या राज्यांपासून कमी फटका बसलेल्या ईशान्य राज्यांपर्यंत किमान चार ते पाच गट करून त्यांना विशेष आर्थिक तसेच वैद्यकीय मदत पोहोचविणे आणि उपाययोजनांची तीव्रता निश्चित करण्याचे नियोजन यात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय या योजनेचे समन्वय संचालन करणार असल्याचे समजते. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी संसदेतील सर्व पक्षांच्या नेत्यांशी ८ एप्रिल रोजी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. तृणमूल काँग्रेसने मात्र या व्हर्च्युअल बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi talks with all-party leaders