कामाची जाहिरात करा : मोदींच्या खासदारांना कानपिचक्‍या

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 मार्च 2017

राज्यातील खासदारांना कानपिचक्‍या; गडकरींचे कौतुक
धनगर समाजासाठी किमान वेगळा आयोग नेमावा, असे सुचविणाऱ्या खासदाराला, तर मोदींनी नंतर एका वरिष्ठ मंत्र्यामार्फत चांगलेच फैलावर घेतल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या खासदारांची बैठक घेऊन त्यांना चांगल्याच कानपिचक्‍या दिल्या. कॉंग्रेसवाले एखादा 50 किलोमीटरचा रस्ता बनवायचे व त्याची जाहिरातबाजी अशी करायचे की त्यावर तीन-तीन निवडणुका जिंकत; आपल्या सरकारने एका झटक्‍यात 500-500 किलोमीटरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करूनही आपण लोकांपर्यंत पोचण्यास कमी का पडतो, असा रोकडा सवाल करून त्यांनी एकीकडे खासदारांचे कान उपटले, तर दुसरीकडे रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठीवर पुन्हा जाहीरपणे शाबासकीची थाप दिली.

आजच्या बैठकीत केंद्राच्या उज्ज्वला, स्वच्छ भारत, डिजिधन, मुद्रा बॅंक, अमृत यांसारख्या योजना जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोचवा आणि 2019च्या निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना केल्या. वेगळे ओबीसी मंत्रालय आणि धनगर समाजाला आरक्षण या बहुचर्चित मुद्द्यांवर मोदींनी प्रथम मौन बाळगले व नंतर 'आपण मंत्रालये वाढवलेली नसून ती कमी केली आहेत,' अशा सूचक शब्दांचाही मार प्रश्‍नकर्त्या खासदाराला दिला. काही खासदारांचे काम चांगले चाललेले नाही, असे सांगून त्यांनी मौनी व निष्किय 'भाजपेयीं'ना इशारा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोदी सध्या राज्यवार भाजप खासदारांना '7 लोककल्याण मार्ग' या आपल्या निवासस्थानी भेटत आहेत. त्यातही भरघोस जागा देणाऱ्या उत्तर प्रदेशाच्या व आगामी निवडणुका होणाऱ्या गुजरात व हिमाचल प्रदेशाच्या खासदारांशी त्यांनी विस्ताराने संवाद साधल्याचे दिसते. आज सकाळी नऊला सुरू झालेली राज्यातील खासदारांची बैठक जेमतेम तासभर चालली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहीर, सुभाष भामरे, अनंतकुमार यांच्यासह मध्य प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे थावरचंद गेहलोत व प्रकाश जावडेकर यांच्यासह सुमारे शंभर भाजप खासदार उपस्थित होते. राज्यातील नाना पटोले, गोपाळ शेट्टी, संजय धोत्रे, डॉ. विकास महात्मे, डॉ. प्रीतम मुंडे आदींनी मुद्दे मांडले. त्यावर मोदींनी त्यांच्या 'स्टाइल'मध्ये संबंधितांना योग्य ती समज दिल्याचे समजते.

ओबीसी आरक्षणाचे आश्‍वासन भाजपने जाहीरनाम्यातही दिले होते, तसेच धनगरांसह इतर वंचित जातींचा समावेश करण्यासाठी तिसरी सूची निर्माण करण्याचा निर्धार, तर खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनी बोलून दाखविला होता असा युक्तिवाद काही खासदारांनी केला. धनगर समाजासाठी किमान वेगळा आयोग नेमावा, अशी पळवाट सुचविणाऱ्या खासदाराला, तर मोदींनी नंतर एका वरिष्ठ मंत्र्यामार्फत चांगलेच फैलावर घेतल्याची माहिती आहे.

कॉंग्रेसवाले एखादा 40-50 किलोमीटरचा रस्ता फक्त जाहीर करायचे व तेवढ्यावर एक निवडणूक जिंकायचे. दुसऱ्या वेळी ते त्याच कच्च्या रस्त्यावर मुरूम टाकून त्याची जाहिरात करायचे व पुन्हा निवडणूक जिंकायचे. तिसऱ्या वेळी ते त्याच रस्त्याचे डांबरीकरण करीत व निवडणूक जिंकत. नितीनजींच्या मंत्रालयाअंतर्गत आपण तर अक्षरशः शेकडो किलोमीटरचे रस्ते अवघ्या अडीच वर्षांत तयार केले आहेत. तुम्ही अशी 'सच्चाई'देखील लोकांपर्यंत पोचवत नाही. हे का होते, असा सवाल मोदींनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चहा - नाश्‍त्याचा बोनस!
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मोदींनी या बैठकीत प्रत्येक खासदाराला त्यांच्या राज्यातील परिस्थिती विचारली. त्यानंतर त्यांनी त्यांना शब्दांचा मार दिला. एकूणच 'मोदींनी बोलावे व खासदारांनी ऐकावे,' या स्टाइलने चालणाऱ्या दर मंगळवारच्या भाजप संसदीय बैठकीचीच झेरॉक्‍स कॉपी म्हणजे आजची बैठक होती. मात्र आज नाश्‍ता-चहा मिळाला हा त्यातील बोनस, अशीही कोपरखळी या खासदाराने मारली.

Web Title: narendra modi tells maharashtra MPs to publicize thier work